झाडीपट्टी रंगभूमीला दिवाळीपासून ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 12:01 PM2021-10-26T12:01:35+5:302021-10-26T12:20:11+5:30
‘ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही’ ही म्हण गेल्या काही वर्षांत झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सीझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो.
घनश्याम नवघडे
चंद्रपूर : कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगांवरील लादण्यात आलेल्या मर्यादा उठविण्यात आल्या आहेत. पूर्ण क्षमतेने चित्रपट व नाट्यगृहांना प्रयोग करण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. यात झाडीपट्टी रंगभूमीचाही समावेश आहे. म्हणूनच झाडीपट्टी रंगभूमीला दिवाळीपासून चांगले दिवस येणार आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. संपूर्ण झाडीपट्टी रंगभूमीचा विचार केला तर ५० कोटींच्या उलाढालीस चालना मिळणार आहे.
नाटक हा कलाप्रकार झाटीपट्टीचा अविभाज्य घटक आहे. ‘ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही’ ही म्हण गेल्या काही वर्षांत झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सीझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. यात उल्लेखनीय बाब अशी की या कालावधीत झाडीपट्टीत समावेश असलेल्या चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांतील बहुतेक गावांत मंडईचे आयोजन होत असते. आणि या मंडईनिमित्त खास नाटकांचे आयोजन करण्यात येते.
अनेक गावांमध्ये खास नाटकासाठी मंडई भरविण्यात येते. काही गावांत तर दोन दोन नाटकांचे प्रयोग होतात. आता तर नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले आहे. एवढेच नाही तर झाडीपट्टी रंगभूमीने आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यातही आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे.
आता तर नाटक सुरू होण्यापूर्वी नाटकाच्या रंगमंचावर नृत्याच्या आयोजनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. या नृत्य संचामध्येही १० ते १२ कलाकारांचा समावेश असतो. मात्र, मधल्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाटकांवर बंदी घालण्यात आल्याने या सर्व कलाकारांसमोर, नाटकांशी संबंधित व्यवस्था आणि सर्व छोट्या व्यावसायिकांवर बिकट परिस्थिती उद्भवली होती. एका माहीतगाराच्या माहितीनुसार चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात ५५ नाटक कंपन्या आहेत. एक कंपनी एका नाट्य प्रयोगासाठी ५५ ते ६० हजार रुपये शुल्क आकारते. भाऊबीजेपासून नाटकांचा हा सीझन सुरू होतो आणि तो होळीपर्यंत चालतो. या कालावधीत २ हजार ५०० प्रयोग होतात.
अनेकांना मिळणार रोजगार
या काळात रंगभूमीवर विविध भूमिका निभावणाऱ्या निर्माते, कलावंत, वेशभूषाकार, ध्वनी व प्रकाश संयोजक, हार्मोनियम, तबला, क्लाट वादक व इतर संबंधित अनेकांना अर्थप्राप्ती होते, हे सर्वश्रुत आहे. याव्यतिरिक्त अनेक घटक या नाटकांवर अवलंबून आहेत. या घटकांमध्ये नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना चणे, फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, चहा, पान विकून आपली उपजीविका चालविणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांचाही समावेश आहे.
झाडीपट्टी रंगभूमी मुळातच श्रीमंत असली तरी या रंगभूमीवरील कलाकार मात्र गरीब आहेत. मधल्या काळात कोरोनाच्या आपत्तीमुळे रंगभूमीवरील प्रयोगांना मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामाअभावी अनेक कलाकारांना विविध संकटांना तोंड द्यावे लागले. आता सरकारने नाट्य प्रयोगांना परवानगी दिली आहे. त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीस निश्चितच पूर्वीचे गतवैभव प्राप्त होईल.
- सदानंद बोरकर, लेखक-निर्माता, नवरगाव