जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:55 PM2018-08-29T22:55:58+5:302018-08-29T22:56:23+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कामगारांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच अन्य सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करून प्रहार संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा काढला होता. कामगारांनी सरकारविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कामगारांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच अन्य सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करून प्रहार संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा काढला होता. कामगारांनी सरकारविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील कामगारांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. कामगार कायदा धाब्यावर बसवून अन्याय केला जात आहे. चार महिन्यांपासून वेतन न दिल्याने कुटुंब चालविण्याचा प्रश्न निर्माण झाला. महिन्याच्या सात तारखेच्या आत कधीच वेतन मिळत नाही. नवीन कंत्राटदाराकडे कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार सामावून घेतले नाही, आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा बुधवारी सातवा दिवस झाले. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. तातडीने न्याय दिला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण खोबरागडे, राष्ट्रीय मुस्लीम हक्क संघर्ष समितीचे मुस्ताक कुरेशी, फिरोज खान पठाण, घनशाम येरगुडे, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे संदीप देव, सुलभ खोब्रागडे, कामगार संघटनेचे सतीश खोब्रागडे, कांचन चिंचेकर, अमोल घोडमारे, सतीश येसांबरे, सागर हजारे, अमर राऊत, अंकित वाघमारे, रवी काळे, स्वप्नील शेंडे, किशोर मंडल,निशा साव, विश्रांती खोब्रागडे, भाग्यश्री मुधोळकर, शेवंता भालेराव, लता उईके, अश्विनी नोमूलवार, संतोषी उमरे,माया वांढरे, रामेश्वरी रगडे, मीना कोंतूमवार, रेखा दुधलकर, धर्मेंद्र शेंडे, अनिल कोयचाळे आदी सहभागी झाले होते.