झरी पर्यटन केंद्रास ३० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:06 PM2019-01-07T23:06:23+5:302019-01-07T23:06:50+5:30
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना सुरू आहे. या योजनेतून १०० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस दिल्या जात आहे. शिवाय सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. ३ कोटींचा निधी खर्चून मौलझरी तलावाची विशेष दुरुस्ती करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना सुरू आहे. या योजनेतून १०० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस दिल्या जात आहे. शिवाय सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. ३ कोटींचा निधी खर्चून मौलझरी तलावाची विशेष दुरुस्ती करण्यात आली. माजी मालगुजारी तलावांच्या विशेष दुरुस्तीची कामे पूर्ण झाली. या परिसरातील झरी पर्यटन केंद्राकरिता ३० लाखांचा निधी लवकरच देण्यात येणार आहे, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
रविवारी चंद्र्रपूर तालुक्यातील डोणी येथे सामाजिक सभागृहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, गौतम निमगडे, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, रामपाल सिंह उपस्थित होते.
ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा परिसर बफर झोन क्षेत्रात येत असल्यामुळे रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नाही. परंतु येत्या काळात डांबरीकरणाचे काम पूर्ण करू. या परिसरात उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध होईल. मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून देशात जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन मदत करत आहे. २५ कोटी खर्चून शहीद शेडमाके यांचे स्मारक चंद्रपुरात उभारण्यात येत आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.
९२ कुटुंबांना ब्लँकेट वाटप
डोणी येथील नागरिकांनी ढोल, ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले. यावेळी ९२ कुटुंबांना ब्लँकेट वितरण करण्यात आले. सीएम चषक स्पर्धेमधील विजेत्यांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.