गडचांदूर नगर परिषद सभापतीपदी जोगी, निमजे, उमरे व वांढरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:15+5:302021-03-01T04:31:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : गडचांदूर नगर परिषदेच्या विविध सभापतीपदांची निवडणूक नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. पाणीपुरवठा, शिक्षण व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : गडचांदूर नगर परिषदेच्या विविध सभापतीपदांची निवडणूक नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. पाणीपुरवठा, शिक्षण व क्रीडा समिती सभापतीपदी पदसिद्ध सभापती व नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांची निवड झाली आहे. तर सदस्यपदी विक्रम येरणे, पापय्या पोन्नमवार, धनंजय छाजेड, रजिया सुलताना शेख ख्वाजा यांची निवड करण्यात आली.
बांधकाम, वित्त व नियोजन समिती सभापतीपदी कल्पना अरुण निमजे तर सदस्यपदी अरविंद मेश्राम, जयश्री ताकसांडे, सागर ठाकुरवार, शेख सरवर शेख शालू यांची निवड करण्यात आली. आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीपदी राहुल उमरे तर सदस्यपदी विक्रम येरणे, मीनाक्षी एकरे, किरण अहिरकर, सुनीता कोडापे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अर्चना वांढरे, उपसभापतीपदी वैशाली गोरे व सदस्यपदी अश्विनी कांबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष सविता टेकाम यावेळी उपस्थित होत्या. गडचांदूर नगर परिषदेमध्ये आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता आहे. यावेळी महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी शिवसेनेच्या वैशाली गोरे यांची निवड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी गडचांदूर नगर परिषदेमध्ये अस्तित्वात आली की काय? अशी चर्चा होत आहे. गतवेळी शिवसेनेला सामील करून घेण्यात आले नव्हते, हे विशेष! सभापतीपदाच्या निवडणुकीला भाजपचे नगरसेवक अरुण डोहे व रामा मोरे अनुपस्थित होते.