गाडेगाव दत्तक गावाची वेकोलिकडून थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 12:54 AM2017-01-19T00:54:12+5:302017-01-19T00:54:12+5:30
वेकोलिची खाण सुरु होणार, बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार, गावात विकासाची गंगा वाहणार, ...
अनेक कामांचा दर्जा निकृष्ट: उद्घाटनानंतर पुढाऱ्यांनी फिरविली पाठ
सास्ती : वेकोलिची खाण सुरु होणार, बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार, गावात विकासाची गंगा वाहणार, अशी अनेक स्वप्ने गाडेगाव विरुरच्या गावकऱ्यांनी बघितली. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत खाण सुरु झाली. वेकोलिने गावाला दत्तक घेतले. मात्र, सद्यस्थितीत या गावात अस्वच्छता, प्रदूषणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
आता राजकीय पुढारी फिरकून पाहत नसल्याने गावाची फसवणूक केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गाडेगाव विरुर येथे वेस्टर्न कोल लिमिटेडअंतर्गत पैनगंगा उपक्षेत्रद्वारा सामाजिक दायित्व अंतर्गत विविध कामे करण्यात आली.
परंतु त्या कामांचा दर्जा, सहा महिन्यांच्या आत समोर आल्याने नागरिकांमध्ये वेकोलिच्या कार्यशैलीचे कौतुक वाटत आहे. २०१५-१६ अंतर्गत लाखो रुपये खर्च करुन गाडेगाव येथील स्मशानभूमीत जाणाऱ्या ३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे खडीकरण सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले.
मात्र अल्पावधीतच अर्धा रस्ता गायब झाला आहे. रस्त्यावर बांधण्यात आलेला पूल चोरीला गेला की, पावसाने वाहून गेला याचा शोध लागलेला नाही.
वेकोलिचे काम अभियंत्यांनी तयार केलेल्या नकाशानुसार होत आहे. यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. सामाजिक दायित्वाच्या नावावर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. परंतु अवघ्या सहा महिन्यात लाखो रुपयांचे काम पहिल्या पावसात वाहून गेले. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापन आणि संबंधित अभियंत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंतिमसंस्कार करण्यासाठी गावातील नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने तारेवरची कसरत करीत रस्ता पार करावा लागत आहे. यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अभियंत्यांवर, कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)