महाकाली यात्रा; यमुनामायच्या धाडसानेच घडते आहे चंद्रपूर वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:57 AM2018-04-06T11:57:09+5:302018-04-06T11:59:25+5:30

यमुनामाय शेकडो भक्तांना सोबत घेऊन माता महाकालीच्या दर्शनासाठी १८६० ला पायी दाखल झाल्या. असंख्य संकटांची पर्वा न करता मीठ-मिरची बांधून त्यांनी हा पल्ला गाठला.

Journey to Mahakali; Chandrapur Vary happens only through the yagnaamay's courage | महाकाली यात्रा; यमुनामायच्या धाडसानेच घडते आहे चंद्रपूर वारी

महाकाली यात्रा; यमुनामायच्या धाडसानेच घडते आहे चंद्रपूर वारी

googlenewsNext
ठळक मुद्देवंशजांनी सुरू ठेवली यात्रा परंपरायमुनामाय १८६० ला दाखल झाल्या होत्या चंद्रपुरात

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नांदेड जिल्ह्यातील शेलगाव ते चंद्रपूर असा तब्बल साडेचारशे किलोमीटरचा कष्टदायी प्रवास पूर्ण करून यमुनामाय शेकडो भक्तांना सोबत घेऊन माता महाकालीच्या दर्शनासाठी १८६० ला पायी दाखल झाल्या. असंख्य संकटांची पर्वा न करता मीठ-मिरची बांधून त्यांनी हा पल्ला गाठला. गवताच्या गाठी पाडून रस्ता तयार करायचा आणि पुढे जायचे... वाटेत कुणा भक्ताने देह ठेवला, की तिथेच मुठमाती देऊन पुढचा प्रवास सुरू... यमुनामायने हे धाडस दाखविले नसते तर चंद्रपुरातील चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत नांदेड जिल्ह्यातील भाविकांची पावले चंद्रपुरात फिरकली नसती. चंद्रपूरचे मंदिर उभारण्यापूर्वीच शेलगावात देवी महाकालीचे मंदिर उभे झाले. आम्ही कष्टावर जगणारी माणसे आहोत. निस्सीम श्रद्धेला व्यवहार नसतो. आम्हाला हा व्यवहार कदापि मान्य नाही. पण, यात्रेत आले की तीन दगडांची चुल मांडण्याचीही सोय केली जात नाही, अशी खंत यमुनमायच्या घराण्याचे वंशज गोविंद महाराज यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील शेलगावची आठवण सांगताना गोविंद महाराज म्हणाले, यमुनामायेला दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला होता. सर्वसामान्य माणसांच्या सुखदु:खाशी प्रामाणिक राहिल्याने मायेला अलौकिकत्व प्राप्त झाले. श्रद्धेच्या कठोर पथावरून जाताना भाविकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या दूर करण्यासाठी तत्कालिन व्यवस्थेशी मोठा संघर्ष केला. चंद्रपुरातील महाकाली यात्रेच्या ‘शेंदुराची मानकरी’ म्हणून यमुना मायेविषयी नांदेड जिल्ह्यातील भाविकांच्या मनात अपार श्रद्धा आहे. उट्टलवाड घराण्यात पिढी-दरपिढी शेकडो कथा-कहाण्या रुजल्या आहेत. त्या घटना व घडामोडींकडे जीवननिष्ट भूमिकेने बघितले तरच श्रद्धेचा खरा अर्थ उलगडतो. चंद्रपुरातील वारीचा मार्ग कसा होता, याची माहिती देताना गोविंद महाराज सांगतात, उमरी, भोकरी, हिमायतनगर, इस्लामपूर, धानोरा, सावरी, बोदडी, चिखली, किनवट, झंडूगुडा, तलामोडगू, आदिलाबाद, जयनथ, सांगळी, मुकूटबन, पारडी, साखरा, वढा, चोराडा या मार्गाने यमुनामाय चंद्रपुरातील महाकाली देवीच्या दर्शनासाठी भक्तांना घेऊन येत होत्या. चंद्रपुरात गोंड राजांनी महाकालीची देवीचे भव्य मंदिर बांधण्यापूर्वीच शेलगावात मंदिर उभारण्यात आले. या मंदिराची उभारणी कुणी केली, यावर अद्याप संशोधन झाले नाही. मात्र, येथेही भव्य यात्रा भरते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच कुस्ती स्पर्धाही आयोजित केली जाते. त्यासाठी कमिटी तयार झाली. मात्र, आम्ही या मंदिराकडे पोट भरण्याचे साधन म्हणून कधीच बघितले नाही. शेती करून कुटुंब चालवितो. यमुना मायेच्या नावाने देणगी उकडून धर्म आणि श्रद्धेचा बाजार मांडण्याला आमचा विरोध आहे. त्यामुळेच चंद्रपुरातील भाविकांची गैरसोय झाल्याचे पाहून व्यवस्थापन कमिटीला धारेवर धरतो. पण, स्थिती सुधारली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गोंड राजांचा उदारपणा
नांदेड जिल्ह्याच्या गावखेड्यातून हजारो भाविक चंद्रपुरात दाखल होतात. ‘यमुनाबाई सेंदुराची मानकरी’ म्हणून आम्ही शेकडो भाविकांना चैत्र यात्रेकरिता चंद्रपुरात आणतो. भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी मंदिर कमिटीने घेतली पाहिजे. पण, अनुभव वाईट आहे. यावेळी गोंड राजांच्या उदारपणाचे स्मरण होते, ही भावना गोविंद महाराजांनी बोलून दाखविली.

... तर यात्रा बंद होऊ शकते !
चैत्र महिन्यातील यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळाल्या नाही तर चंद्रपुरात कोण येणार ? तसेही नांदेड जिल्ह्यातील शेलगाव येथील देवी महाकाली मंदिरस्थळी भव्य यात्रा भरते. साधी दंवडी दिली तरी चंद्रपुरातील यात्रा बंद होऊ शकते, असा दावाही गोविंद महाराजांनी यावेळी केला.

इतिहासाच्या पानातून...
इतिहास अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे ‘चंद्रपूरच्या देवीची महाकाली चैत्र यात्रा’ या पुस्तकात लिहितात, ‘अभ्यासकांच्या मतानुसार, त्रेतायुगात कृतध्वज राजाने वसविलेली लोकपूर राजधानी म्हणजे चांदा होय. द्वापार युगात चंद्रहास राजाची ही राजधानी ‘इंदूपूर’ या नावाने ओळखली जात होती. कालांतराने गोंडराजा खांडक्या बल्लाळशहाने सुमारे १४५० मध्ये येथे किल्ल्याचा पाया घातल्यानंतर राजधानी उदयास आली. महाकाली देवीबाबतची पौराणिक आख्यायिका अशी आहे... त्रेतायुगातील राजा कृत ध्वजाला सुनंद नावाचा पूत्र होता. असे म्हणतात की त्याला देवीचा दृष्टांत झाल्यामुळे एका विशिष्ट ठिकाणातील जमिनीचे उत्खनन करण्यात आले. तेव्हा एका भुयारातील शिळेवर कोरलेली भव्य मूर्ती दृष्टीस पडली. हीच महाकाली देवी होय. या विषयीचा उल्लेख स्कंध पुराणातील सह्याद्री खंडात (५२-५३) मध्ये आला आहे. महाकाली मंदिराच्या पाषाणात एक कोरलेली गुंफ ा आहे. तिथे स्वतंत्र शैलगृहे गुंफ ा बघायला मिळतात. एका शैलगृहात महाकाली देवीची प्रतिमा शैलगृहाच्या भीतीवर देव्हारा करून स्थापन केली आहे. देवीला पूर्णत: शेंदूर लावल्यामुळे मूर्तीशास्त्राच्या दृष्ट्याने अद्याप अभ्यास झाला नाही. पुढे द्वापार युगातील चंद्रहास राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. १५ व्या शतकात गोंडराजा खांडक्या बल्लाळशाहने महाकालीचे मंदिर व्यवस्थितरित्या बांधले. त्यानंतर गोंडराजा बीरशहा इ. स. (१६९६ ते १७०४) यांची पत्नी राणी हिराईने १७०४ मध्ये छोट्या मंदिराच्या ठिकाणी भव्य मंदिर बांधले. हेच मंदिर सध्या अस्तित्वात असून बीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून राणी हिराईने चैत्र पौणिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथा सुरू केली. त्यानंतर नांदेड येथील देवी उपासक राजाबाई (यमुनामाय) देवकरीन सुमारे १८८० साली चैत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या सेवेत हजर झाली. हजारो भक्तांसह येथे १५ दिवस थांबून चांद्याला देवीची उपासना करू लागली.’

पोतराजा आणि देवकरीन 
शेकडो वर्षांपूर्वी पठाणपूरा दरवाजातून दगडी ओट्यावर नारळ

 व आरती करून प्रसाद ठेवल्यानंतरच भाविक चंद्रपुरात प्रवेश करायचे. या शिवेपासून भक्तगण रस्त्यावर लोटांगण घालत देवीचे स्तवन म्हणत मंदिरापर्यंत यायचे. लोटांगणाची परंपरा आता बंद झाली. त्यावेळी वाहतुकीची साधने नव्हती. आता वाहनांद्वारे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. यात्रेत येणाºया पुरुष भक्तांना ‘पोतराजे’ व स्त्री भक्ताला ‘देवकरीन’ असे म्हणतात. पोतराजे हे साठधारी असून अंग उघडे, डोक्यावर केसांचा भारा, गळ्यात लांबलचक साठ-मुठीचा भाग मोठा आणि आकाराने गोलाकार व खालचा आकार बारीक असतो. त्यावर घुंगराची सैलशी माळ, पायात खेड भरलेले मोठे पितळी वाळे असतात. केसांचा अंबाडा, कपाळी कुंकवाचा टिळा, मळवट, हातात शेंदुराने माखलेला साठ घेऊन देवीच्या प्रांगणात येतात. हे पोतराजे डफच्या तालावर देवीचे स्तवन गातात. यंदाच्या यात्रेतही बरेच पोतराज सहभागी झाले आहेत.

यमुनामायचे वंशज
यमुना मायच्या भक्तीचा वारसा अनेक पिढ्यांनी मोेठ्या श्रद्धेने जोपासला. हजारो भक्तांना चंद्रपुरात आणण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. याच उट्टलवाड वंशातील ९६ वर्षीय यमुनामाय ही परंपरा पुढे नेत आहे. माधव नरबाजी उट्टलवाड, गोंविद महाराज माधव, नरहरी माधव, सुनील माधव, सुनील गोंविद, अनिल गोंविद ही पिढी माता महाकाली देवीच्या भक्तीचा वारसा आज सांभाळत आहे. यात्रेदरम्यान संपूर्ण कुटुंब चंद्रपुरात दाखल होते. संकटप्रसंगी भाविकांच्या मदतीला धावून जातात.

Web Title: Journey to Mahakali; Chandrapur Vary happens only through the yagnaamay's courage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.