घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:41 IST2020-05-05T17:41:15+5:302020-05-05T17:41:38+5:30
लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अडकून पडलेले तब्बल १२०० मजूर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विशेष रेल्वे गाडीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचले.

घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता..
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अडकून पडलेले तब्बल १२०० मजूर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विशेष रेल्वे गाडीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांना घराची ओढ लागली होती. रेल्वेगाडीतून उतरून बाहेर पडताच लगबगीने प्रत्येकजण आपली बस शोधत होते. एकदाचे आपल्या जिल्ह्यात पाय ठेवल्याचा आनंदही या मजुरांच्या चेहऱ्यावर दिसत होता. काही मजुर आपल्या मुलाबाळांसह या लॉकडाऊनमध्ये अडकले होते. हे सर्व मजूर आपल्या गावाला सुखरुप पोहचले आहे.
या सर्व मजुरांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हाताच्या मनगटावर शिक्के मारण्यात आले. त्यांचे सॅनिटायझरने हात स्वच्छ करून भोजनाचे पॉकेट दिले गेले. यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करून दिलेल्या २५ बसेसच्या माध्यमातून त्यांना तालुकास्थळी व तेथून स्वगृही पोहचवून देण्यात आले. या सर्व मजुरांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. यावर प्रशासनाची देखरेख असेल. रेल्वे स्थानकावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लॉकडाऊनमुळे या मजुरांना आंध्र प्रदेशात अडकून राहावे लागले. हाताला काम नाही आणि जवळ रुपयाही नाही, अशा बिकट परिस्थितीचा सामना या मजुरांना गेले दीड महिन्यापासून करावा लागला. त्यांना स्वगृही आणण्यासाठी विशेष गाडीची सुविधा करण्यात आली होती. या गाडीने आलेल्या मजुरांनी आपल्या जिल्ह्यात पाय ठेवताच पोहचल्याचा आनंद त्यांच्या चेहºयावर होता. सोबतच आपल्या घराची ओढही त्यांच्या चेहºयावर स्पष्ट जाणवत होती. मजुरांना घेऊन रेल्वेगाडी चंद्रपूर स्थानकावर आली त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, उपायुक्त विशाल वाघ, तहसीलदार सामान्य संजय राईंनचवार, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार, डॉ. वनिता गर्गेलवार, समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, स्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्ती, तसेच राज्य व रेल्वे पोलीस अधिकारी तर जिल्हा आरोग्य विभागाचे, महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.