न्यायाधीशांमध्ये अंतर्मनातून प्रामाणिकपणा असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:42+5:30
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून राज्याचे माजी अर्थ व नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीचे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे व्यासपीठावर विराजमान होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : न्यायाधीशांना कायद्याचे ज्ञान कमी असले तरी चालू शकते, मात्र ते अंतर्मनाने प्रामाणिक असले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे लोकायुक्त मदनलाल टहलियानी यांनी शनिवारी येथे केले. चंद्रपूर प्रेस क्लबच्या वतीने शनिवारी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या चंद्रपूर गौरव सन्मान सोहळ्यात लोकायुक्त मदनलाल टहलियानी यांना मान्यवरांच्या हस्ते ‘चंद्रपूर गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून राज्याचे माजी अर्थ व नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीचे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे व्यासपीठावर विराजमान होते. सत्कारमूर्ती व आज चंद्रपूर गौरव सन्मान सोहळ्याने सन्मानित मदनलाल टहलियानी यांनी आजचा सत्कार मूल आणि चंद्रपूर येथील समस्त जनतेला समर्पित केला. या सोहळ्यात चंद्रपूर येथील आश्रम शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या ४० वर्षांपासून वृत्तपत्र वाटप करणाऱ्या क्षेत्रात काम करणाºया वसंता चेनलवार, पुंडलिक दखणे, मारोती धाबेकर या हॉकर्सचा सत्कार करण्यात आला. वंदना दखणे या वृत्तपत्र वाटप करणाऱ्या भगिनीचा सत्कार विशेष उल्लेखनीय ठरला.
आमदार मुनगंटीवार म्हणाले, टहलियानी म्हणजेच प्रामाणिकपणा आणि हाच प्रामाणिकपणा त्यांनी आपल्या न्यायदानाच्या दायित्वामध्ये दाखवून दिला. जग बदलणे अतिशय सोपे आहे. मात्र त्याची सुरुवात स्वत:पासून करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक वानखडे म्हणाले, कोणाच्या दबावात काम करणे हा पत्रकारांचा स्वभाव असू शकत नाही. अशा प्रकारच्या दबावाचे वर्णन करणारे व पळवाट काढणारे पत्रकार असू शकत नाही. तुमचे ऐकायला समाज तयार आहे. तुम्हाला दाद द्यायला यंत्रणा तयार आहे. तुम्ही बोलणे मात्र सोडू नका. व्यवस्थेच्या विरुद्ध बोलणे. सातत्याने सुरू ठेवा. कारण ती तुमची ओळख आहे. ती समाजाची आपल्याकडून अपेक्षाही आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक संजय तायडे यांनी तर संचालन संजय रामगिरवार, आभार रवींद्र जुनारकर यांनी मानले.
प्रहार करण्याची ताकत माध्यमांमध्ये - विजय वडेट्टीवार
लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारितेचे महत्त्व अबाधित आहे. आजच्या काळाची तुलना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वृत्तपत्रातून मांडलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीशी होऊ शकत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषितांसाठी आपल्या वृत्तपत्रातून मांडलेल्या विचारांची होऊ शकत नाही. पण आजच्या समाजव्यवस्थेला अनावश्यक असणाºया विचारांवर प्रहार करण्याची ताकद आजही माध्यमांमध्ये आहे, असे विचार ना. विजय वडेट्टीवार यांनी मांडले.