अवघ्या आठ तासात लावला चोरीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:31+5:302021-02-13T04:27:31+5:30
ब्रह्मपुरी : स्थानिक ब्रह्मपुरी-नागभीड मार्गावर असलेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेत गुरुवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. सदर पतसंस्थेच्या ...
ब्रह्मपुरी : स्थानिक ब्रह्मपुरी-नागभीड मार्गावर असलेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेत गुरुवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. सदर पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने याची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये केली होती.
त्यानुसार ब्रम्हपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या आठ तासात सदर पतसंस्थेचा चपराशी राजू गराडे (३२) यास अटक केली.
त्याच्याकडून चोरीस गेलेली पाच लाख २५ हजार १४० रुपयांची रोख रक्कम व चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करीत अवघ्या आठ तासात चोरीच्या घटनेचा छडा लावला. गुरुवारी सकाळी पतसंस्थेचा चपराशी पतसंस्थेत आला असता त्याला पतसंस्थेच्या मॅनेजरचा दरवाजा उघडा दिसला. तसेच काही सामान अस्ताव्यस्त दिसून आले होते. याची माहिती सदर चपराशाने मॅनेजर आनंद वसाके यांना दिली असता त्यांना पाच लाख २५ हजार १४० रुपयांची चोरी झाल्याचे दिसले. ब्रम्हपुरी पोलिसांत तक्रार करण्यात आली. तपासाची चक्रे वेगाने फिरवून पतसंस्थेचा चपराशी राजू गराडे यालाच संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एका तांदळाच्या डब्यात लपवून ठेवलेले पाच लाख २५ हजार १४० रुपये सापडले. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली लोखंडी सळाख व कटर जप्त करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, राजेश उंदिरवाडे, स्वाती फुलेकर, पोहवा अरुण पिसे, डीबी पथकाचे कर्मचारी अमोल गिरडकर, योगेश शिवणकर, संदेश देवगडे, अजय कटाईत, शुभांगी शेमले यांनी केली.