केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 05:00 AM2022-01-17T05:00:00+5:302022-01-17T05:00:34+5:30

सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली.

In just eight months, six Thanedars were transferred to Ramnagar Thane | केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

googlenewsNext

परिमल डोहणे 
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वात मोठे ठाणे म्हणून ओळख असलेल्या रामनगर ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदाराला गुन्हेगारांची ओळखपरेड होण्यापूर्वीच बदली करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठ महिन्यांचा विचार केल्यास आठ महिन्यात रामनगर ठाण्यात चक्क सहा ठाणेदारांची बदली झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. 
चंद्रपूर उपविभागांतर्गत चंद्रपूर शहर, रामनगर, घुग्घुस, दुर्गापूर, पडोली हे पोलीस स्टेशन येतात. यापैकी सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. एक महिन्यातच जयस्वाल यांच्याकडून पदभार काढून त्यांना सायबर सेलमध्ये पाठवून प्रदीप शेवाळे यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. परंतु, शेवाळेही यांना दीड महिन्याचा कालावधी होताच त्याची सावली तालुक्यातील पाथरी येथे बदली करून मधुकर गीते यांची नेमणूक करण्यात आली. गीते यांनी साडेतीन महिने कारभार सांभाळल्यानंतर त्यांची बढती नागपूर येथील लाचलुचपत विभागात करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी राजेश मुळे यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. मात्र संवेदनशील ठाणे म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात  ठाणेदार बदलत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे.

ठाण्यात २५ च्यावर अधिकाऱ्यांची गरज
चंद्रपूर उपविभागातील सर्वात मोठे ठाणे म्हणून रामनगरची ओळख आहे. तसेच हा संवेदनशील ठाणा म्हणून ओळखल्या जातो. सर्व शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक याच ठाण्याच्या हद्दीत येतात. मंत्र्यांचे दौरे, बंदोबस्त आदी कामात पोलीस गुंतले असतात. या ठाण्यात २५ च्या जवळपास अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ ८ ते १० अधिकारी कार्यरत असतात. त्यातही दोन ते तीन प्रोबिशनल पिरेडवर असल्याने उर्वरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतो. त्यामुळे या ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. 

 ‘ते’ कर्मचारी वर्षानुवर्षे रामनगर ठाण्यातच
- सर्वसाधारपणे एका ठाण्यात ठाणेदार दोन ते अडीच वर्षांचा कार्यकाळ काढत असताना दिसून येतात. परंतु, मागील काही महिन्यात रामनगर ठाण्यातील चित्र बघितले असता केवळ दोन ते तीन महिन्यातच ठाणेदारांची बदली झाली आहे. परंतु, येथील काही कॉन्स्टेबल वर्षानुवर्षे याच ठाण्यात काम करताना दिसून येतात. तसेच येणाऱ्या प्रत्येक ठाणेदारांच्या जवळचे व विश्वासातले म्हणून त्यांची ओळख पसरत आहे. ठाणेदार दोन महिन्याला एक बदलत असताना तो कॉन्स्टेबल तेथेच कार्यरत दिसून येतो हे न उलगडणारे कोडेच आहे.

 

Web Title: In just eight months, six Thanedars were transferred to Ramnagar Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.