कधी करणी, जादूटोणा; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:13+5:302021-08-25T04:33:13+5:30
महाराष्ट्राला संत चळवळीचा वारसा आहे. संतांनी अलौकिक जीवनाचा अर्थ सांगताना लौकिक जीवनाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. देव-धर्माच्या नावावर चुकीच्या ...
महाराष्ट्राला संत चळवळीचा वारसा आहे. संतांनी अलौकिक जीवनाचा अर्थ सांगताना लौकिक जीवनाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. देव-धर्माच्या नावावर चुकीच्या प्रथा-परंपरा माणुसकीला मातीत घालतात, हे अतिशय सोप्या पद्धतीने संत तुकाराम व कर्मयोगी गाडगेबाबांनी कीर्तनातून समजावून सांगितले. अलीकडे भौतिक सुखाच्या नादी लागलेल्यांनी देवा-धर्माच्या नावावर करणी, चेटूक, भूतबाधा झाल्याचे भासवून अशिक्षित, उच्चशिक्षितांनाही नादी लावणारे बाबाबुवांचे पेव फुटले. आजारपण अथवा संकटात सापडलेल्यांना हेरून नादी लावणाऱ्या अशा बाबांचा अनेकांवर मोठा धाक आहे. त्यांचे शिष्य संकटग्रस्तांना शोधून जाळ्यात ओढत आहेत. यातूनच करणी जादूटोण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार झाला. मात्र, प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने बाबाबुवांना आळा बसला नाही. काही राजकीय नेतेही मतांवर डोळा ठेवून अशा बाबांना अभय देतात. परिणामी, कशी पैशांसाठी पाऊस तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती करण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. कायदा अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्यात ३२ घटनांची नोंद झाली.
बॉक्स
आजारपण अथवा संकटात सापडलेल्यांना हेरून नादी लावणाऱ्या बाबाबुवांचे शहरी व ग्रामीण भागात प्रस्थ वाढत आहे.
बाबाबुवांचे शिष्य नाना प्रकारच्या कथा, कहाण्या, चमत्कार पसरवून संकटग्रस्तांना आपल्या जाळ्यात ओढतात. विशेषत: महिलांच्या आग्रहाखातर संपूर्ण कुटुंबच अंधश्रद्धेच्या गर्तेत ओढले जात आहे.
बॉक्स
कोरोना काळापासून बाबाबुवा वाढले
अशिक्षित,आर्थिक दुर्बलतेशी सामना करणारी अनेक कुटुंबं कोरोना काळापासून पुन्हा समस्यांच्या विळख्यात सापडले. उदरनिर्वाहाची साधने गेली. त्यातच कोरोना महामारीने आरोग्याच्या समस्या वाढविल्या. पोट भरायलाच संघर्ष करावा लागतो तिथे बाबाबुवांनी खोटी स्वप्ने दाखवून आपला स्वार्थ साधणे सुरू केले. गावातच मठ उभारून शिष्यांचा गोतावळा तयार केला.
बॉक्स
नवीन संपर्क साधने ज्ञानासाठी वापरा
मोबाइलने संपर्क साधने वाढविली. मात्र, हजारो वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या अंधश्रद्धेचे किटाळ दूर झाले नाही. मोबाइल व व्हॉट्सॲप या साधनांनी थिल्लर मनोरंजन नव्हे तर ज्ञान व परिवर्तनवादी विचारांसाठी वापरण्याची मनोभूमिका तयार करावी लागणार आहे.
बॉक्स
विकास योजनाही पोहोचवा
अशा कठीण काळात ग्रामीण व शहरी भागातील युवापिढीला विज्ञाननिष्ठ विचारांशी जोडावे लागणार आहे. लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रात अडकवून ठेवल्यास बाबाबुवांचे फावते. त्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. प्रशासकीय यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे.
कोट
लोकांनी श्रद्धा जरूर जोपासावी. मात्र चुकीच्या प्रथा-परंपरा श्रद्धेच्या नावावर स्वीकारू नये. प्रगतीआड येणाऱ्या अनिष्ट प्रथांचा त्याग करावा. विज्ञानवादी विचारांचा स्वीकार करून आयुष्य जगावे. आपल्या आयुष्याचे सूत्र बाबाबुवांकडे कदापि सोपवू नये.
-धनंजय तावाडे, समुपदेशक, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर