काजलचा मृतदेहही नीट पाहू दिला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:34 AM2017-11-26T00:34:45+5:302017-11-26T00:35:14+5:30
पोलीस काजलने आत्महत्याच केली म्हणत आहे. पण तिने आत्महत्या केली नाही. तिची हत्याच करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : पोलीस काजलने आत्महत्याच केली म्हणत आहे. पण तिने आत्महत्या केली नाही. तिची हत्याच करण्यात आली आहे. मात्र पोलीस आत्महत्येचा बनाव करून प्रकरण दडपण्याच्या मनस्थितीत दिसत असल्याचा गंभीर आरोप मृत काजलचे मोठे वडील काशीनाथ हनवते यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
‘लोकमत’ने काजलचे मृत्यू प्रकरण उचलून धरल्यामुळे आम्हाला यामध्ये न्याय मिळण्याची आशा कायम आहे, असेही ते म्हणाले.
काजलचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे माहिती होताच तिथे गेलो. काजलच्या एका नाकातून रक्त निघत होते आणि दुसºया नाकातून पाण्याचे बुडबुडे निघत होेते. तिचा मृतदेह काहीच वेळापूर्वीचा होता.
पोलिसांनी मृतदेह विहिरीतून काढला व लगेच चादरीमध्ये गुंडाळून रुग्णालयात नेला. तो कुणालाही पाहू दिला नाही. घटनास्थळाचा पंचनामाही थातूरमातूर करून आत्महत्याच असल्याचा सूर आवळणे सुरू केले. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पोलिसांकडून अपेक्षा संपली
पोलीस तपास करण्याच्या मन:स्थितीत नाही. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे सिंदेवाहीला येणार आहे. असे सांगून पोलीस ठाण्यात बोलाविले. मात्र तेथे गेलो असता ते निघून गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना तपास करायचा नसेल, तर आमच्याकडून तपास करू नका असे लिहून द्यावे, असे खुद्द ठाणेदाराला म्हटले, अशी हतबलताही काशीनाथ हनवते यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.