‘कमला दास’ प्रबंधातून अस्सल जीवनार्थ समजण्यासारखा; चंद्रशेखर धर्माधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:58 AM2018-07-25T11:58:21+5:302018-07-25T11:59:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सुप्रसिद्ध मल्याळी कवयित्री कमला दास यांनी भारतीय साहित्याला गतीमान केले. चाकोरीच्या पलिकडे जावून लेखणातून बंडखोर भूमिका मांडणाऱ्या या लेखिकेवर संशोधन प्रबंध लिहिणे हे साधे काम नाही. समग्र लेखणातून अस्सल जीवनार्थ समजून घेण्यासाठी डॉ. जया द्वादशीवार यांचा ‘कमला दास’ हा इंग्रजी प्रबंध प्रत्येकाने आवर्जुन वाचला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. इंग्रजी प्रबंधाचे विमोचन करताना सोमवारी एनडी हॉटेल सभागृहात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने, डॉ. पी. के. देशपांडे, सव्वाशेहून अधिक मतिमंद व अपंग मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर, डॉ. जया द्वादशीवार पब्लिक स्कूलचे संस्थापक मोहम्मद जिलानी उपस्थित होते.
निवृत्ती न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी डॉ. जया द्वादशीवार लिखित ‘कमल दास’ या इंग्रजी प्रबंधाचे मौलिकत्व अधोरेखित केले. हा प्रबंधक साहित्य विश्वाला नवे वळण देणारा असल्याचे सांगून ग्रंथाची सामर्थ्यस्थळे विषद केली. धर्माधिकारी म्हणाले, डॉ. जया द्वादशीवार यांच्याकडे सामाजिक दृष्टी होती. या दृष्टिकोनातूनच त्यांनी प्रबंधाची निर्मिती केली. जीवनातील सर्व परीक्षांमध्ये त्या गुणवत्ता यादीत प्रथम आल्या होत्या. विकाररहित श्रीकृष्ण आणि विकाररहित सहजीवन समजून घ्यायचा असेल तर डॉ. द्वादशीवार यांचा प्रबंध वाचला पाहिजे. समाजस्रेही व विलक्षण व्यक्तिमत्त्वामुळेच त्या दर्जेदार लेखन करू शकल्या.
डॉ. लहाने म्हणाले, डॉ. जयाताई यांनी मला मुलाप्रमाणे वागविले. त्यांच्यामुळेच डॉक्टर होऊ शकलो. ‘आनंदवन’ मुळे आम्ही त्यांच्याशी जुळलो. प्रबंध विमोचनाच्या कार्यक्रमाप्रसंगी समाजाभिमुख कार्य करणाºयांचा सत्कार होत असल्याने मला विशेष आंनद झाला, असेही ते म्हणाले. याप्रसंगी मूल येथे डॉ. जया द्वादशीवार पब्लिक स्कूल सुरू करणारे मोहम्मद जिलानी व शंकरबाबा पापळकर यांचा अनुक्रमे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी पापळकर यांचा मानसपुत्र विधुर यांनी ‘अशी पाखरे येती’ हे गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे, लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार, माजी आमदार अॅड. एकनाथ साळवे, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार वामनराव चटप, डॉ. कन्ना मडावी, बाबूराव तिडके, अतुल लोंढे, अरूणा सबाने, अनंतराव घारड, वामन तेलंग, सुप्रिया अय्यर, गयाचरण त्रिवेदी, डॉ. रजनी हजारे, किशोर जोरगेवार, विनायक बांगडे, सुभाष गौर, प्रकाश देवतळे, सुनिता लोढीया, शालिनी भगत, प्रा. जया कापसे-गावंडे, सविता भट, श्रीपाद जोशी, भास्कर भट्ट, विनोद दत्तात्रेय, अॅड. विजय मोगरे, रमेश बोरकुटे, बाबासाहेब देशमुख, डॉ. सालफळे, डॉ. मंगेश गुलवाडे, अजय स्वामी, नंदा अल्लूरवार, प्रा. सुरेश चोपणे, संजय वैद्य, राजू कंचर्लावार आदींसह महाराष्ट्रातील विविध भागातील मंडळी आवर्जून उपस्थित होते. प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे तर संचालन डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले. पुस्तकाचा परिचय प्रा. पराग धनकर यांनी करून दिला. नंदू नागरकर यांनी आभार मानले.
सत्कारमूर्तींना प्रत्येकी लाखांचा धनादेश
सत्कारमूर्ती शंकरबाबा पापळकर व मोहम्मद जिलानी यांना डॉ. जया द्वादशीवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमासाठी डॉ. जयाताई यांच्या भगिनी शैला, वसुधा तसेच पुष्पा नागरकर कुटुंबीयांतर्फे साड्या भेट देण्यात आल्या. यावेळी ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार उपस्थित होते.
मतिमंद मुलांसाठी शासनाने कायदा करावा - शंकरबाबा पापळकर
समाजाने टाकून दिलेल्या शेकडो बालकांना मी आपलेसे केले. त्यांना जगण्याचे बळ दिले. हे कार्य करताना‘लोकमत’ने मला मोठे केले. मला आता अनुदान अथवा पुरस्कार नको. अंध, अपंग, मतिमंद मुलांना त्यांचे १८ वर्षांनंतरचे आयुष्य देखील रिमांड होममध्ये घालविता यावे, यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे. समाज सेवेचे फळ मला मिळाले. ही सेवा मी आयुष्य भर सुरूच ठेवणार आहे. डॉ. जयाताईचे ऋण कदापि विसरू शकत नाही.
डॉ. जयाताईंच्या नावाने ट्रस्ट स्थापन करणार - जिलानी
डॉ. जया द्वादशीवार यांच्या नावाने मूल येथे पब्लिक स्कूल सुरू करून
सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प केला. या शाळेला मान्यताही मिळाली. ही शाळा सर्वांची असून गुणवत्तेच्या दृष्टीने वेगळ्या उंचीवर नेणार आहे. डॉ. जयाताई यांच्या नावाने लवकरच एक ट्रस्ट स्थापन करणार आहे.
-मोहम्मद जिलानी