कांजीपेठ- बल्लारपूर-पुणे रेल्वेगाडी रखडली

By Admin | Published: May 25, 2015 01:39 AM2015-05-25T01:39:54+5:302015-05-25T01:39:54+5:30

कांजीपेठ- बल्लारपूर या मार्गाने पुणेकरिता रेल्वे गाडी सुरु करावी, अशी मागणी या भागातील जनतेची बऱ्याच वर्षांपासून आहे.

Kangipith- Ballarpur-Pune train crossing | कांजीपेठ- बल्लारपूर-पुणे रेल्वेगाडी रखडली

कांजीपेठ- बल्लारपूर-पुणे रेल्वेगाडी रखडली

googlenewsNext

बल्लारपूर: कांजीपेठ- बल्लारपूर या मार्गाने पुणेकरिता रेल्वे गाडी सुरु करावी, अशी मागणी या भागातील जनतेची बऱ्याच वर्षांपासून आहे. या भागातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच प्रवाशी मंडळींनी प्रत्येक वेळच्या रेल्वेमंत्री तदवतच संबंधित रेल्वच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिले आहेत. या मागणीत पुणेकरिता या मार्गाने गाडी सुरू करणे कसे आवश्यक आहे, हे मुद्देही अनेकवार संबंधितांपुढे मांडले आहेत, परंतु त्यावर प्रत्येक मंत्र्यांनी या संदर्भात तपास सुरू आहे, असेच उत्तर पाठविले आहे. या प्रकारे जनतेच्या या आवश्यक मागणीकडे आजवर सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.
चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ तसेच सीमावर्ती तेलंगणातील आदिलाबाद, करीमनगर, वरंगल या जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे येथे उच्च शिक्षण घेतात. केवळ राज्यातच नव्हे तर देशातील एज्युकेशन हब म्हणून पुण्याची प्रसिद्धी देशभरात आहे. तदवतच, औद्योगिक शहर म्हणून या शहराने आपली ओळख निर्माण केली आहे. या कारणाने, पुण्याला जाण्या-येण्याचे काम वरील सहाही जिल्ह्यातील लोकांना येते. या भागातील विद्यार्थी व इतरांना पुण्याला जाण्याकरिता नागपूर अथवा वर्धा येथे जाऊन तेथून पुण्याकरिता गाडी पकडावी लागते. यात गाडीची वाट बघत राहण्यात वेळ खर्च होतोच, शारिरीक व मानसिक त्रासही होतो. हा त्रास या भागातील विद्यार्थी व जनतेला अनेक वर्षांपासून सोसावा लागत आहे. हा त्रास दूर व्हावा, याकरिता या भागातून म्हणजे कांजीपेठपासून बल्लारपूर, वर्धा या मार्गाने जाणारी पुणे गाडी सुरू केल्यास लोकांची पुण्याला जाण्याला चांगली सोय होईल आणि रेल्वेला तिकीटातून चांगला महसूलही मिळू शकतो. प्रायोगिक तत्वावर निदान अशी साप्ताहिक गाडी सुरू करता येते. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, आंध्रप्रदेशचे माजी खासदार पूनम प्रभाकर (करीमनगर), रमेश राठौड (आदिलाबाद) इत्यादींनी ही मागणी वेळोवेळी उचलून धरली. पण, या संदर्भात याबाबत तपास केला जात आहे, असेच उत्तर संबंधितांकडून लोकप्रतिनिधींना नेहमी दिले जात आहे. दहा पंधरा वर्षापासून हेच सुरू आहे. २००७ ला रेल्वेच्या वरिष्ठांनी या मागणी संदर्भात एक बैठक घेतली होती. त्यात लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रवाशी मंडळाने ही मागणी उचलून धरली. मात्र पुढे त्यात काहीच प्रगती झाली नाही. चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनने या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या संघाने परत एक निवेदन नुकतेच दिले आहे. चंद्रपूर-गडचिरोली हे जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. या भागातील ग्रामीण व शहरी भागाचा या ना त्या कारणाने पुण्याशी संबंध येतो. आदिवासींच्या विकासावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मग, या भागाच्या प्रवाशांच्या सुविधेकरिता आणि अत्यंत आवश्यक असलेल्या कांजीपेठ- बल्लारपूर पुणे गाडी सुरू करावी, या मागणीकडे दुर्लक्ष करुन या भागातील लोकांची उपेक्षा केली जात आहे. ती होऊ नये याकडे प्रवाशी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी या निवेदनातून रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
सुरेश प्रभु हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांना या भागातील लोकांच्या समस्यांची चांगली जाण आहे. त्यामुळे ते मागणीकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी आशा ‘लोकमत’शी बोलताना सुंचूवार यांनी व्यक्त केली. याबाबत या भागातील युवकांना रेल्वेकडून ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kangipith- Ballarpur-Pune train crossing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.