स्थानिकांचा विरोध झुगारून कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याचा डाव

By admin | Published: March 25, 2017 12:47 AM2017-03-25T00:47:21+5:302017-03-25T00:47:21+5:30

कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याच्या शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे.

Kanhargaon sanctuary | स्थानिकांचा विरोध झुगारून कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याचा डाव

स्थानिकांचा विरोध झुगारून कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याचा डाव

Next

४८ गावातील नागरिक रोजगारमुक्त : जनतेच्या रोजगारापेक्षा वाघांच्या संरक्षणावर भर
सुरेश रंगारी कोठारी
कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याच्या शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक आदिवासी गोरगरीब कुटूंबावार उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण होणार असल्याने या अभयारण्यास स्थानिकांनी कडवा विरोध दर्शविला आहे.
मागील दोन वर्षापासून कन्हारगाव अभयारण्य करण्यासाठी वन्यजीव संघटना शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. ही बाब स्थानिक जनतेला समजली तेव्हापासून या प्रस्तावाला विरोध सुरू झाला. त्यासाठी गावकऱ्यांनी मोर्चे, आंदोलन व धरणे दिले. स्थानिक क्षेत्राचे खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार सुभाष धोटे, आ. नाना श्यामकुळे, आ. शोभाताई फडणवीस, माजी आ. सुदर्शन निमकर यांनी कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यात येवू नये, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला.
तसेच गोंडपिपरी, पोंभूर्णा व बल्लारपूर तालुक्यातील ४८ गावाचे सरपंच, उपसरपंच, जि.प. सदस्य, पं.स. सदस्यांनी अभयारण्याला विरोध करण्यासाठी शासनाकडे ग्रा.पं. ठराव आमसभेचा ठराव, निवेदने पाठविली. मात्र शासनाने स्थानिक ग्रा.पं.च्या ठरावाला केराची टोपली दाखून वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यासाठी तत्परता दाखवित आहे.
कन्हारगाव क्षेत्र महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे मध्य चांदा प्रभाग बल्हारशाहाच्या ताब्यात आहे. या क्षेत्रासह झरण, तोहोगाव व धाबा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील कामावर गोंडपिपरी, पोंभूर्णा, बल्लारपूरसह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चार ते पाच हजार मजूर धान शेतीनंतर काम करतात. या क्षेत्रातील कामातून आदिवासी व इतरांना सतत आठ महिने रोजगार उपलब्ध होतो. या रोजगारामुळेच कुटूंबाचे उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण, लग्न यासारख्या जटील समस्याचे निराकरण होते.
कन्हारगाव अभयारण्यामुळे ४७ गावे बाधित होवून हजारो कुटुंबाच्या रोजगाराची व उदरनिर्वाची समस्या गंभीर होणार आहे. स्थानिकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्रस्त शेतकऱ्यांना या क्षेत्रातील कामे त्याचा मोठा आधार असून तेच हिरावले गेल्यास विविध समस्या उत्पन्न होवून ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ४२ गावांना या अभयारण्याचा फटका बसून गावागावात संसार थाटणाऱ्या गावकऱ्यांना निर्वासिताचे जीवन जगावे लागणार आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.

वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे षडयंत्र
सध्या कन्हारगाव वनक्षेत्रात वाघाचे व इतर वन्यप्राण्यांचे संरक्षण व संगोपन उत्तमरित्या अभयारण्य घोषित न करतासुद्धा करीत आहे. या क्षेत्रात आजपर्यंत कोणत्याही शिकारीच्या घटना घडलेल्या नसताना केवळ वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे.

रोजगारासाठी करावे
लागणार पलायन
कन्हारगाव अभयारण्य घोषित होण्याचे स्थानिक गावकऱ्यांना सजले असून त्यांच्यात भिती निर्माण झाली आहे. आता रोजगारासाठी परप्रांतात पलयान करण्याची वेळ आली असून शासन स्थानिकांच्या पोटावर पाय देण्याचे षडयंत्र करीत असल्याचा तीव्र भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

Web Title: Kanhargaon sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.