चंद्रपूर जिल्ह्यातील कुनाडा कोळसा उत्पादन सहा महिने ठप्प राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:33 AM2017-12-08T11:33:29+5:302017-12-08T11:35:55+5:30
माजरी वेकोलि क्षेत्रातील कुनाडा कोळसा खाणीत विस्तीर्ण मातीचा ढिगारा कोसळून १ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे वेकोलिला जबर फटका बसला आहे. परिणामी कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत या खाणीतून कोळसा उत्पादन करणे आता वेकोलिसाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
राजेश भोजेकर ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : माजरी वेकोलि क्षेत्रातील कुनाडा कोळसा खाणीत विस्तीर्ण मातीचा ढिगारा कोसळून १ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे वेकोलिला जबर फटका बसला आहे. परिणामी कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत या खाणीतून कोळसा उत्पादन करणे आता वेकोलिसाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
वेकोलिच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. धनसार इंजिनिअरींग प्रायव्हेट कंपनीने नियमबाह्यपणे कोळसा उत्पादन केल्याचे सुरूवातीपासूनच वेकोलि अधिकारी सांगत आहे. यावर आता विशेष चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. या अहवालाच्या आधारे आरोप निश्चित करून सदर कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शक्यताही वेकोलिच्या सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली.
कुनाडा कोळसा खाणीत अपघात झाल्यापासून १५ दिवसांपर्यंत काम बंद ठेवण्यात आले आहे. अपघाताची भीषणता विचारात घेता पुढील सहा महिन्यांपर्यंत या कोळसा खाणीतून कोळश्याचे उत्पादन सुरू करणे शक्य नसल्याची माहितीही सूत्राने दिली. सेंट्रल माईन प्लॅनिंग अॅन्ड डिझाईन आॅथोरेटी आॅफ इंडियाकडून (सीएमपीडीआय) रितसर मंजुरी घेऊन त्यांनी आखून दिलेल्या गाईडलाईनप्रमाणेच काम करावे लागते. मात्र धनसार कंपनीने कोळसा उत्पादनाच्या हव्यासापोटी हे सर्व मापदंड बाजुला ठेवल्याची बाब चौकशीत पुढे असल्याचेही समजते.
वेकोलि अधिकाऱ्यांनाही होती तडा गेल्याची माहिती
मातीच्या ढिगाऱ्याच्या चारही बेंचला तडा गेल्याची माहिती कामगारांनी धनसार कंपनीसह वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेली होती. परंतु उत्पादन ठप्प होऊ नये म्हणून कामगारांचा जीव धोक्यात घालून कोळशा उत्खनन सुरू ठेवले होते. वेकोलि अधिकारीही काहीच माहिती नसल्याचे भासवत होते, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. घटनेनंतर येथे भेटी देणाऱ्या वरिष्ठ अधिकारी व राजकीय मंडळींपासूनही ही माहिती दडवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
कामगारांना गप्प राहण्याची धमकी
या घटनेनंतर वकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्या आहे. घटनेमागील सत्यता पुढे येऊ नये, यासाठी कंत्राटदार कंपनीकडून पूर्णत: काळजी घेतली जात आहे. कामगारांना याबाबत काही बाहेरची मंडळी धमकावत असल्याची कुजबुज सुरू आहे.
ही घटना भीषण होती. याचा जबर फटका वेकोलिला बसला आहे. ज्या कंपनीला कोळसा उत्पादनाचे कंत्राट दिले होते. त्या कंपनीने सीएमपीडीआयच्या मापदंडानुसार काम केले वा नाही याची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेपासून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. चौकशी अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
- हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार.