सैनिकी स्कूलमध्ये अनुभवता येणार कारगिल युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:47 AM2019-07-26T00:47:43+5:302019-07-26T00:48:46+5:30
कारगिल युद्धात भारताचा पाकिस्तानावर विजय हे या देशातील शूरवीर सैनिकांचे खूप मोठे, उत्तुंग यश आहे. हे युद्ध कसे व कोणत्या स्थितीत झाले. आपल्या जवानांनी सर्वत्र पसरलेले बर्फ, त्यात खरतड मार्ग, किट्ट अंधारी रात्र अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी धैर्याने कठीण परिस्थितीशी शत्रूला तोंड देत शत्रूंना कसे पिटाळून लावले,....
वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : कारगिल युद्धात भारताचा पाकिस्तानावर विजय हे या देशातील शूरवीर सैनिकांचे खूप मोठे, उत्तुंग यश आहे. हे युद्ध कसे व कोणत्या स्थितीत झाले. आपल्या जवानांनी सर्वत्र पसरलेले बर्फ, त्यात खरतड मार्ग, किट्ट अंधारी रात्र अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी धैर्याने कठीण परिस्थितीशी शत्रूला तोंड देत शत्रूंना कसे पिटाळून लावले, याचे सचित्र व बोलके दर्शन लोकांना व्हावे, त्याची सविस्तर माहिती त्यांना कळावी, यासाठी भिवकुंडवरील चंद्रपूर सैनिकी स्कूल येथे १० हजार फुट क्षेत्रफळाचे चित्रमय दालन उभारले जात आहे. आपण प्रत्यक्ष कारगिलच्या रणभूमीत उभे आहोत, असा रोमांचकारी अनुभव या दालनातून मिळणार आहे.
पाकिस्तानने सीमारेखेचे उल्लंघन करून, भारताच्या चौक्यांवर कब्जा जमविला होता. त्या चौक्यातून पाकी सैन्यांना हुसकावून त्या परत आपल्या ताब्यात घेण्याकरिता भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावली. उंचवट्यावर शत्रू, खालच्या बाजूने त्यांच्यावर मारा करणे सोपे काम नव्हते. मात्र थलसेना आणि वायूसेना यांनी ते शौर्याने करून दाखविले आणि शत्रूच्या कब्जा असलेल्या संपूर्ण चौक्या २६ जुलै १९९९ ला त्यांच्याकडून परत मिळविल्यात. कारगिल युद्धातील ठळकपणा! म्हणून २६ जुलैला कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहाने देशात साजरा केला जातो. आपल्या सैनिकांच्या शौर्याची ही कथा सैनिकी स्कूलमध्ये लाईव्ह युद्धाने दाखविली जाणार आहे. हवाई हमले, बांब स्फोट, सैनिकांची शत्रूंवर चाल इत्यादी सारे बघत असताना आपण स्वत: कारगिल युद्धभूमीवर उभे आहोत, असा जिवंत अनुभव घेता येणार आहे. याची इमारत उभी झाली असून त्याचे काम सुरू आहे. येत्या ६ महिन्यात ते पुर्ण होईल. सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहणार!
कारगिल भागात बर्फाचा मोसम सुरू झाल्यावर तेथे राहणे कठीण असल्याने भारत - पाक या दोन्ही बाजूने सैनिक मागे हटतात व ठाणी (चौकी) सोडतात. हा अनौपचारिक नियम होता. आपली ठाणी दक्षिणेस तर त्यांची ठाणे उत्तरेकडे! त्यांच्याकडील बर्फ आपल्यापेक्षा पंधरवड्याने वा महिनाभर आधी वितळतो. त्याचा फायदा घेत नियमांचे उल्लंघन करून त्यांनी भारतीय सेनेच्या गैरहजेरीत भारताच्या ठाण्यांवर कब्जा केला. ती ठाणी परत मिळविण्याकरिता हे युद्ध झाले व भारत त्यात यशस्वी ठरले. सैनिकी स्कूलमध्ये २६ जुलैला सकाळी ९ वाजता कारगिल विजय दिन कार्यक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती या स्कूलचे प्राचार्य नरेश कुमार यांनी दिली आहे.