कर्नाटका कंपनी अधिकाऱ्याला मारहाण; शिवसेना जिल्हाप्रमुखासह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 12:25 PM2023-10-04T12:25:53+5:302023-10-04T12:26:13+5:30

मृत कामगाराच्या मोबदल्यावरून राडा : मोबदला देण्यास अधिकाऱ्याकडून नकार

Karnataka company officer assaulted; Shiv Sena district chief along with four arrested | कर्नाटका कंपनी अधिकाऱ्याला मारहाण; शिवसेना जिल्हाप्रमुखासह चौघांना अटक

कर्नाटका कंपनी अधिकाऱ्याला मारहाण; शिवसेना जिल्हाप्रमुखासह चौघांना अटक

googlenewsNext

भद्रावती (चंद्रपूर) : हृदयविकाराने मृत पावलेल्या कंत्राटी कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देण्याच्या मागणीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) मुकेश जीवतोडे यांनी कर्नाटक एम्टा कंपनीच्या अधिकाऱ्याला मंगळवारी (दि. २) दुपारी ३ भद्रावती ग्रामीण रुग्णालय परिसरात मारहाण केल्याने खळबळ उडाली. कंपनीतील एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी जीवतोडे यांच्यासह चौघांना अटक केली. मनीष जेठानी, अमित निभ्रट, महेश जीवतोडे अशी अटकेतील अन्य तिघांची नावे आहेत.

केपीसीएल कंपनीत कर्तव्यावर असताना सोमवारी कंत्राटी कामगार जितेंद्र राम अवतार (३७, रा. भद्रावती) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ३ वाजता शवविच्छेदन सुरू असताना शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे) मुकेश जीवतोडे हे कार्यकर्त्यांसह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाले.

मृत कामगाराच्या कुटुंबाला कंपनीच्या नियमानुसार २० लाखांचा मोबदला देण्याची मागणी केली. मात्र, नियमात बसत नसल्याने आर्थिक मोबदला देता येणार नाही, अशी भूमिका केपीसीएलचे अधिकारी नाईक यांनी घेतली. त्यावरून जिल्हाप्रमुख जीवतोडे व नाईक यांच्यात जोरदार वाद झाला. जीवतोडे व अन्य तिघांनी मारहाण केली, अशी तक्रार कंपनीचे अधिकारी नाईक यांनी केली. या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेनाप्रमुख मुकेश जीवतोडे, मनीष जेठानी, अमित निभ्रट, महेश जीवतोडे यांच्याविरुद्ध भादंवि ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. रात्री जामिनावर सर्वांची सुटका करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे करीत आहेत.

मृत कामगाराच्या कुटुंबाला नियमानुसार आर्थिक मदत देण्याची मागणी कंपनीच्या अधिकाऱ्याकडे केली. मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. चुकीची कारणे सांगून मदतीला नकार दिला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्या कुटुंबाच्या मदतीसाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे.

- मुकेश जीवतोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे)

Web Title: Karnataka company officer assaulted; Shiv Sena district chief along with four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.