कापडी पिशव्यातून काटवनच्या ३० महिलांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:03 PM2018-04-16T23:03:20+5:302018-04-16T23:03:20+5:30
तालुक्यातील काटवन या आदिवासीबहुल ग्रामपंचायत अंतर्गत काटवन, करवन, करवनटोला, चिंचोली या गावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत या गावांची निवड करण्यात आली असून विविध विकास कामांना गती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील काटवन या आदिवासीबहुल ग्रामपंचायत अंतर्गत काटवन, करवन, करवनटोला, चिंचोली या गावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत या गावांची निवड करण्यात आली असून विविध विकास कामांना गती मिळाली आहे. नुकतेच गावातील ३० महिलांना कागदी व कापडी पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आल्याने महिलांना यातून रोजगार मिळाला आहे.
काटवन येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक वर्षा कोडापे यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सुरु केले आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लॉस्टीक बंदी केली आहे. त्यामुळे कापडी व कागदी पिशवी निर्मीतीसाठी करवन, काटवन, चिंचोली व करवन टोला येथील महिला बचत गटाच्या महिलांना गावातच १० दिवसांचे प्रशिक्षण चंद्रपूर येथील संयुक्त महिला मंचाने दिले.
येथील आदिवासी महिलांना रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. जंगल व वन्यप्राण्याच्या भितीने शेतीतही फारसे उत्पन्न मिळत नसल्याने येथील महिलांनी लघु उद्योगासाठी पुढाकार घेतला. विविध किराणा दुकान, बाजारपेठेत आता काटवनच्या महिला कागदी व कापडी पिशवी विकण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. यातून आर्थिक हातभार मिळत असल्याने महिलांच्या उपजिविकेला हातभार मिळाला आहे.