जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे !

By Admin | Published: February 15, 2017 12:36 AM2017-02-15T00:36:16+5:302017-02-15T00:36:16+5:30

मिनी मंत्रालयाच्या ५६ तसेच पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी संपली असून मूक प्रचाराला आता सुरूवात झाली आहे.

Keep awake ... the night is the enemy! | जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे !

जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे !

googlenewsNext

चंद्रपूर : मिनी मंत्रालयाच्या ५६ तसेच पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी संपली असून मूक प्रचाराला आता सुरूवात झाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासोबतच मतदारांवर पैशाची उधळण व दारूची सोय तसेच समाजाला विविध साहित्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मात्र शेवटच्या रात्री अनेकांचा ‘गेम’ केला जातो. त्यामुळे मतदान पूर्वीच्या रात्रीला ‘कत्तल की रात’ असे म्हटल्या जाते. याच रात्री प्रामाणिक कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी जागते रहो...चा इशारा सहकाऱ्यांना दिला असून प्रचारासाठी अनेक उमेदवारांदी ‘इको फ्रेंडली’ पर्याय निवडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ५६ जिल्हा परिषद गटासाठी व ११२ पं. स. गणासाठी १६ फेब्रुवारी गुरुवारला मतदान होत आहे. या निवडणुकीत आघाडी व युतीची ताटातुट झाल्याने सर्व पक्ष वेगळी चूल मांडून निवडणूक लढवित आहेत. त्यात राष्ट्रीयकृत पक्षासह अपक्ष, आघाडीचे उमेदवार रिंगणात असल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मताची लीड कमी होणार म्हणून एका-एका मताची किंमत वाढली आहे.
सध्या सर्वच निवडणुकांत पैशाचा वापर दिसून येत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अपवाद नाही. यावर प्रशासनाची करडी नजर असली तरी ग्रामीण क्षेत्रात एका मताला ५०० रुपये तर मोठ्या आर्थिक भक्कम असलेल्या क्षेत्रात एका मताचा भाव हजार रूपयापर्यंत असल्याची चर्चा होवू लागली आहे. जास्त उमेदवार असलेल्या गटात पैशाचा पाऊस पडत असून महत्त्वाचे म्हणजे मतदानाचा आदल्या दिवशी जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे! असे म्हणत, सर्वच उमेदवार आपआपल्या गावातील वार्डात खडा पहारा देत असल्याची स्थिती आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत तरुणापासून ज्येष्ठांनीही दोन हात करण्याची तयारी केली आहे. मात्र यावेळी पैशाचा वारेमाप वापर सुरू असल्याचे चित्र असून लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील देवदर्शन, जेवणाचे लीन आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीतही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गावा-गावातील पक्षाचे कार्यकर्ते आपल्या निष्ठावान नेता निवडून आला पाहिजे म्हणून रात्र-रात्र जागून काढण्याची तयारी चालविली आहे. घोडमैदान जवळच असल्याने काय होणार ते लवकरच दिसणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

दोन दिवसांच्या मूक प्रचारावर उमेदवारांचे भाग्य
ब्रह्मपुरी : सद्यातरी सर्वच प्रमुुख पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उर्वरीत दोन दिवसात मूक प्रचारावरुन उमेदवारांचे भाग्य फडफडणार आहे. शेवटच्या टप्प्यात भेटीगाठीवर जोर असल्याने उमेदवार व कार्यकर्ते परस्परासमोर उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा कस लागल्यामुळे नेते मंडळी मूक प्रचाराचा धुरळा उडवून देणार आहेत. यामुळे अनेकांची समिकरणे बिघडण्याची शक्यता आहे. गट-गणात पदयात्रा, वाऱ्या, टोली बेघरांवर उमेदवारांची विशेष लक्ष राहणार आहे. मतदार ज्या ठिकाणी असेल त्याचा शोध घेऊन मत झोळीत टाकण्याचा प्रयत्न होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारांवर करडी नजर ठेवून जणू काही चंगच बांधलेला दिसून येत आहे.

११ लाख ५७ हजार ७५४ मतदार करणार मतदान
जिल्ह्यात गतवर्षी व यावर्षी काही नवीन नगरपंचायती स्थापन झाल्या. त्यामुळे गतवेळच्या तुलनेत यावेळच्या निवडणुकीत मतदार संख्या घटली आहे. ५६ जिल्हा परिषद व ११२ पंचायत समिती गणात ११ लाख ५७ हजार ७५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यात ६ लाख १ हजार ८६६ पुरूष मतदार तर ५ लाख ५५ हजार ८८७ महिला मतदार आहेत.
जि. प. व पं. स. साठी ८३४ उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषदेच्या ५६ क्षेत्रासाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. यात १६५ पुरूष तर १५० महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर १५ पंचायत समित्यांच्या ११२ गणासाठी ५१९ उमेदवार रिंगणात असून यात २६४ पुरूष उमेदवार तर २५५ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

युवा मतदारांवर विशेष लक्ष
विजयाचे शिल्पकार युवा मतदार ठर असल्याने सर्व उमेदवारांचे लक्ष युवा मतदारांवर लागले आहे. सर्वच क्षेत्रात युवा मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने युवांकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

जाहीरनाम्याला बगल
प्रचार थंडावला असला तरी कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जाहीरनाम्यावर भर दिलेला नाही. पक्ष आणि उमेदवार या दोनच मुद्दांवर निवडणूक लढविली जात असून ग्रामीण मतदार जाहीरनाम्यापासून अनभिज्ञ आहेत.

दोन दिवस शाळांना सुट्टी
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान पथकांतील अधिकारी, कर्मचारी यांना तालुका मुख्यालयांतून मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर १५ फेब्रुवारी रोजी पोहचविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकातील अधिकारी, कर्मचारी हे मतदान केंद्राचा ताबा घेऊन आपले साहित्य मतदान केंद्रावर ठेवतात. त्यामुळे ज्या क्षेत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येत आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात मतदान केंद्र ठेवण्यात आलेल्या शाळांना १५ व १६ फेब्रुवारी रोजी सुट्टी दिल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्हाभरात १४५० मतदान केंद्रे
जिल्ह्यातील नागरी क्षेत्र वगळता सर्वत्र निवडणूक होत असून यासाठी १४५० मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले आहेत. या केंद्रांवर १३० क्षेत्रीय अधिकारी, १५९६ मतदान केंद्राध्यक्ष व ६ हजार ३७५ मतदान अधिकारी कार्यरत राहणार आहेत.

३५८ वाहने आरक्षित
जिल्ह्यातील १४५० मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचविणे व कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी ३५८ वाहने आरक्षीत करण्यात आली आहेत. यात १८७ बसगाड्या तर १७१ जीपचा समावेश आहे. निवडणुकीसाठी १३० झोनची निर्मीती करण्यात आली आहे.

६३ नक्षलग्रस्त संवेदनशील मतदान केंद्र
जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील १४५० मतदान केंद्रापैकी १७८ मतदान केंद्र संवेदनशिल तर ६३ मतदान केंद्र नक्षलग्रस्त संवेदनशिल म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे. १२०९ मतदान केंद्र सर्वसाधारण आहेत.

सुरक्षेसाठी राज्य राखीव
पोलीस दलाच्या दोन कंपन्या
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. सोबतच ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक, ४०७ पोलीस हवालदार, २३५४ पोलीस कर्मचारी, ९४४ होमगार्ड कार्यरत राहणार आहेत. यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Keep awake ... the night is the enemy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.