मनपा हद्दीतील आरक्षित भूखंडांकडे डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:28 AM2021-09-19T04:28:36+5:302021-09-19T04:28:36+5:30
चंद्रपूर शहरासाठी विकास आराखडा नगर रचना विभागाने तयार केला. महापालिकेने मंजुरीही दिली आहे. आराखड्यानुसार शहर विकास होणे अपेक्षित आहे. ...
चंद्रपूर शहरासाठी विकास आराखडा नगर रचना विभागाने तयार केला. महापालिकेने मंजुरीही दिली आहे. आराखड्यानुसार शहर विकास होणे अपेक्षित आहे. नगरविकास आराखड्यानुसार प्रत्येक गोष्टींसाठी भूखंड आरक्षित केले जाते. त्यामध्ये दवाखाना, रस्ते, शाळा, क्रीडांगण, बगिचा आदींचा समावेश असतो. प्रत्येक ले-आऊटमध्ये ले-आऊटच्या क्षेत्राच्या १० टक्के जागा ओपनस्पेस म्हणून आरक्षित ठेवली जाते; मात्र चंद्रपुरातील अनेक ले-आऊटमध्ये अशी आरक्षित जागा गायब करण्याचे प्रकार सुरू आहेत. अशीच अवस्था क्रीडांगण व बगिच्यांची झाली आहे. चंद्रपुरातील ३३ प्रभागांचे क्षेत्र गृहित धरल्यास या शहरात किती बगिचे व क्रीडांगण असले पाहिजे, हे शहर विकास आराखड्यात नमूद असेल; मात्र शहरात परिस्थिती भिन्न आहे. सध्या अनेक ठिकाणी छोटेखानी बगिचे तयार झाले आहेत. शहराचा पसारा बघता या बगिचांची संख्या कमी आहे. मुलांंसाठी क्रीडांगणेही कमी दिसतात. या बाबींसाठी शहर विकास आराखड्यात भूखंड आरक्षित आहेत. नगरपालिका अस्तित्वात असतानापासून याकडे लक्ष दिले नाही. कुठल्याच वापरात नसलेले हे भूखंड नागरिकांनी हळूहळू आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे. या आरक्षित भूखंडांची सध्या वाट लागली आहे. महानगरपालिकेने व नगर रचना विभागाने या आरक्षित भूखंडांची गांभीर्याने चौकशी करणे आता गरजेचे झाले आहे, तरच विविध प्रभाग विकसित होऊ शकणार आहे.
बॉक्स
मनपा करू शकते खासगी जागा आरक्षित
नागरिकांना शहरात बांधकामे करताना सार्वजनिक बाबींसाठी काही जागा आरक्षित ठेवावी लागते. ले-आऊटनुसार रस्ते मंजूर असतात. रस्ता नागरिकांच्या मालमत्तेमधून जात असेल तर मालमत्तेतून रस्त्याची जागा मनपा आरक्षित ठेवते. या आरक्षणानंतरच बांधकामाला परवानगी दिली जाते. जागेचा मोबदला मनपाला मालमत्ताधारकांना द्यावा लागतो; परंतु मनपाने अनेक ठिकाणी अशी भूखंडे आरक्षित केली नाही. नागरिकांनी त्यावर बांधकामे केली आहेत.
बॉक्स
भूखंडावर कचऱ्याचे ढिगारे
शहरातील अनेकांनी प्लाट खरेदी करून ठेवले. अनेक वर्षांपासून त्यावर बांधकामे केले नाही. तिथे झाडेझुडुपे व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशा कचऱ्यायुक्त भूखंडांमुळे शहर सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.