पीक विमासाठी शेतकऱ्यांचे गावागावात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:41+5:302021-03-26T04:27:41+5:30
बँकेकडून घेतलेले पैसे अपुरे पडत असल्यामुळे उसनवार पैसे घेऊन महागडे खते, औषधे आवश्यक प्रमाणात टाकून जोमदार पीक उभे केले. ...
बँकेकडून घेतलेले पैसे अपुरे पडत असल्यामुळे उसनवार पैसे घेऊन महागडे खते, औषधे आवश्यक प्रमाणात टाकून जोमदार पीक उभे केले. पीक हाती येण्याच्या सुमारास निसर्गाच्या अवकृपेमुळे हाती येणारे धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांची पीक विम्याची आशा बळावली. पिकाच्या झालेल्या नुकसानीचा ४८ तासात पंचनामा करून ३० दिवसांच्या आत झालेल्या नुकसानीची भरपाई विमा हप्ता शेतकऱ्याचा मिळाला पाहिजे, यासाठी शेतकरी शेतमजूर महासंघाने काही दिवसांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन तशी मागणी केली होती. त्याला एक महिना झाला. परंतु विमा हप्ता मिळाला नाही. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे धरणे सत्याग्रह होणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांनी दिली. गुंजेवाही, पळसगाव जाट, भेंडाळा, नांदगाव, नवरगाव, पेंद्री, वासेरा शिवनी, मोहाडी, पेटगाव, कळमगाव, सरटपार, किनी, मुरमाडी, इत्यादी गावात शेतकऱ्यांचे धरणे सत्याग्रह ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या सत्याग्रह धरणेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी शेतमजूर महासंघाने केले आहे.