इंधन दरवाढ कमी करण्याचे जिवतीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:51 AM2021-02-18T04:51:43+5:302021-02-18T04:51:43+5:30
जिवती : पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी तहसील कार्यालय जिवती येथे युवक काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून ...
जिवती : पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी तहसील कार्यालय जिवती येथे युवक काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारकडून दररोज होत असलेली डिझेल, पेट्रोल, गॅसची दरवाढ थांबविण्यात केंद्र शासन सपशेल अपयशी ठरले आहे. गेल्या सहा वर्षात एकूणच अनेक वस्तूंची दुपटीने झालेली भाववाढ बघून सर्वसामान्य जनता मात्र त्रस्त झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार जिवती युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यात स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होते.
जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनात पेट्रोल, डिझेल व गॅस आवश्यक बाब आहे. त्यामुळे यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन दरवाढ कमी करावी व सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी धरणे आंदोलनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
याप्रसंगी जिवती तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गणपत आडे, माजी जि प सदस्य भीमराव पाटील मडावी, जिवती तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष सीताराम मडावी, महिला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नंदा मुसणे, प स सभापती अंजना पवार, नगर पंचायत जिवतीचे अध्यक्ष अशफाक शेख, माजी सभापती सुग्रीव गोतावडे, माधवराव डोईफोडे, भीमराव पवार, कांताताई क्षीरसागर, केशव भालेराव, रोहिदास आडे, माधव मोरे यासह युवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.