घोडपेठ येथे केरोसीनचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 12:52 AM2016-01-11T00:52:51+5:302016-01-11T00:52:51+5:30
येथील परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांच्या मनमानीने नागरिक त्रस्त झाले आहेत. केरोसीन धारकांचा हक्क डावलून हे केरोसीन काळ्याबाजारात विकले जात आहे.
विके्रत्याची मनमानी : हजारो लिटर केरोसीन केले गडप
वतन लोणे घोडपेठ
येथील परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांच्या मनमानीने नागरिक त्रस्त झाले आहेत. केरोसीन धारकांचा हक्क डावलून हे केरोसीन काळ्याबाजारात विकले जात आहे. हा प्रकार मागील बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे हजारो लिटर केरोसीनचा घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घोडपेठ व परिसरातील गावांना केरोसीन वाटप करण्यासाठी कमल बाबुजी बरडे यांना परवाना दिला आहे. सोबतच बद्रिप्रसाद जैस्वाल यांचाही केरोसीनचा कोटा बरडे यांना संलग्न करण्यात आला आहे. मात्र केरोसीन वितरणात त्यांची मनमानी सुरू आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे.
केरोसीन विकत घेण्यासाठी येणाऱ्या कार्डधारकांना नोव्हेंबर महिन्याचे केरोसीन सोडवले नसल्याचे विक्रेत्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात संबंधित विभागाकडे चौकशी केली असता, नोव्हेंबर महिन्यामध्ये सदर विक्रेत्याने ४०० लिटर केरोसीनची उचल केली असल्याचे समजते. त्यामुळे कार्डधारकांचे हक्काचे ४०० लिटर केरोसीन कुणाच्या घशात गेले, असा प्रश्न निर्माण होत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये सदर विक्रेत्याने ७५० लिटर केरोसीनची उचल केली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये केरोसीन सोडविले नसल्याचे कारण समोर करून ग्राहकांना परत पाठविण्यात आले. तसेच डिसेंबर महिन्यामध्ये ग्राहकांना एकाच महिन्याचे केरोसीन देण्यात आले. तर जवळच्या काही ग्राहकांना दोन्ही महिन्याचे केरोसीन वाटप करण्यात आले व शिधापत्रिकेवर तशी नोंदही करण्यात आली.
आपल्याला किती केरोसीन मिळायला पाहिजे याची बऱ्याच कार्डधारकांना कल्पना नसते. त्यामुळे केरोसीन विक्रेत्यांचे चांगलेच फावते. २० आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागातील बिगर गॅस शिधापत्रिका धारकांसाठी शिधापत्रिकेवरील व्यक्तींच्या संख्येनुसार केरोसीन वाटपाचे परिमाण निश्चीत करण्यात आले आहे. यानुसार एका व्यक्तीस २ लिटर, २ व्यक्तीस ३ लिटर व ३ वा त्याहून अधिक व्यक्ती असणाऱ्या कुटुंबांना ४ लिटर केरोसीन मिळणार आहे.
मात्र, घोडपेठ येथील विक्रेता बऱ्याच कार्डधारकांना दोन लिटर एवढेच केरोसीन वाटप करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी होत आहेत. तरीही या केरोसीन विक्रेत्याचा मनमानी कारभार सुरूच आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने त्यांच्याकडील केरोसीन परवाना रद्द करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
'रेकॉर्ड'मध्येही हेराफेरी
बरेच कार्डधारक काही कारणास्तव केरोसीन सोडवत नाहीत. ते केरोसीन विक्रेत्याकडे शिल्लक असते. हे केरोसीन मर्जीतल्या काही खास ग्राहकांना ३० ते ५० रुपये प्रतिलीटर या हिशोबाने विकले जाते. हे केरोसीन कार्डधारकांनाच दिले अशा पध्दतीने 'रेकॉर्ड' तयार केला जातो. कार्डधारकांच्या हक्काच्या केरोसीनची काळ्याबाजारात अशा पध्दतीने विल्हेवाट लावली जाते.
वितरण प्रणाली समिती नावापुरतीच
केरोसीन वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर सार्वजनिक वितरण प्रणाली समितीची स्थापना करण्यात येते. यामध्ये गावातील सरपंच हे पदसिध्द अध्यक्ष असतात. तलाठी पदसिध्द सचिव व ग्रामसेवक हे पदसिध्द सदस्य व इतरही सदस्य असतात. घोडपेठ येथे सात सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, केरोसीन वाटपाबाबतचा अपहार लक्षात घेता ही समिती कागदावरच असल्याचा प्रत्यय येत आहे.
महिला बचत गटाला अधिकार द्यावे
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन पुढाकार घेऊन महिला बचत गटाची संकल्पना राबवित आहे. काही ठिकाणी महिला बचत गटामार्फत केरोसीन वितरणाचे कार्य करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर घोडपेठ येथील केरोसीनचा काळाबाजार थांबविण्यासाठी सदर विक्रेत्याचा परवाना रद्द करून गावातीलच महिला बचत गटाला केरोसीन वितरणाचे कार्य देण्यात यावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.