मनपाच्या शाळेतही केजीचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:31 AM2017-06-10T00:31:23+5:302017-06-10T00:31:23+5:30
महानगरपालिकेच्या शाळांचे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शाळा प्रवेशपूर्व आढावा बैठक महापौरांनी घेतली. त्यामध्ये मुख्याध्यापकांनी विविध समस्या मांडल्या.
महापौरांची सूचना : शाळा प्रवेशपूर्व आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: महानगरपालिकेच्या शाळांचे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शाळा प्रवेशपूर्व आढावा बैठक महापौरांनी घेतली. त्यामध्ये मुख्याध्यापकांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी नवीन ैशैक्षणिक सत्रात के.जी.चे वर्ग आणि सेमी इंग्लिश माध्यम सुरू करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
नवीन शैक्षणिक सत्रात १६ शाळांमध्ये केजी १, केजी २ चे तसेच सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्यात आले आहे. या प्रमाणे नवीन शैक्षणिक वर्षात मिशन मोडमध्ये शाळांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन संपूर्ण शाळा डिजिटल बनविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शाळांना रंगरंगोटी करणे, दर्शनीय भागाची सजावट करणे, शाळेत मुला - मुलींकरिता प्रसाधनगृह, कुंपण भिंतीचे बांधकाम करणे आदी कामांना जोमाने सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बसण्याकरिता नवीन बेंचेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शाळेच्या प्रथम दिवशी पाठ्यपुस्तके, गणवेश व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन शाळेतर्फे प्रत्येक विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत करण्याचे ठरविलेले आहे. संपूर्णपणे आदर्श व डिजिटल बनविण्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, सावित्रीबाई कन्या प्राथमिक शाळा व भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर प्राथमिक शाळा या तीन शाळांची निवड करण्यात आली आहे.
महापौर अंजली घोटेकर यांनी सत्तेवर येताच शाळेच्या कामकाजाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मुख्याध्यापकांची सभा घेऊन शाळेतील भौतिक सुविधांचा व अडचणींचा आढावा घेतला. त्यातून पुढे आलेल्या अडचणी व शाळेत उपलब्ध नसलेल्या भौतिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. तसेच मनपाच्या शाळा आधुनिक व सर्व सुविधा युक्त, डिजिटल करण्याकरिता कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सर्व शिक्षकांना खान यांनी नि:शुल्क इंग्रजी भाषेचे मार्गदर्शन करण्यात आले.
महापौरांनी आपल्या पाल्यांना महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा, त्यांना सर्व सुविधायुक्त शाळा, उत्तम शिक्षक, संगणकीय ज्ञानाच्या फायदा या सर्वगोष्टी फक्त महानगरपालिकेच्या शाळेत आता मिळणार, तसेच विविध क्रीडा स्पर्धाही होण्यात येतात. नि:शुल्क व दर्जेदार शिक्षण, वर्षभर व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम मनपा शाळेद्वारे घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.