४ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर होणार खरीप पेरणी
By Admin | Published: June 15, 2016 01:07 AM2016-06-15T01:07:09+5:302016-06-15T01:07:09+5:30
दुष्काळ व रबी हंगामाच्या वेळी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.
कृषी विभागाचे नियोजन : रासायनिक खते व बियाणे उपलब्ध
चंद्रपूर : दुष्काळ व रबी हंगामाच्या वेळी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने ४ लाख ६० हजार १०० हेक्टरवर खरीप पीक पेरणीचे नियोजन केले असून बियाणे व खतांचे आवंटन मंजूर करून घेतले आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्र वाढणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
खरीप हंगामाला सुरूवात झाली असून आता फक्त पावसाची प्रतीक्षा लागली आहे. सध्या शेतकरी हंगामपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. उन्हाचा पार अद्यापही कमी झालेला नसला तरी शेतकरी कामात व्यस्त असून पाऊस पडल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
यावर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, तूर, कापूस, आदी पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात ४ लाख ६० हजार १०० हेक्टरवर होणाऱ्या पेरणीद्वारे ७०० लाख ४ हजार क्विंटल उत्पन्न होणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना सतत नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
मात्र शेतकरी खचलेला नसून नव्या जोमाने खरीपाच्या तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही.
विशेष म्हणजे, २०१३ आणि २०१४ असे सातत्याने दोन वर्ष शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. २०१३ मध्ये तर खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. २०१४ मध्ये थोडेफार उत्पन्न झाले. त्यानंतर २०१५ मध्येही समाधानकारक पाऊस न झाल्याने उत्पन्नात कमालीची घट झाली. त्यानंतर रबी हंगामातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले होते. मात्र यावर्षी चांगल्या उत्पन्नाची प्रतीक्षा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
भाताचे सर्वाधिक क्षेत्र
यावर्षीच्या खरीप हंगामात १६ लाख ७० हजार क्षेत्रावर भात पिकाची पेरणी करण्याचे नियोजन आहे. तर सोयाबीन १ लाख हेक्टर, कापूस १ लाख ४० हजार, तूर ४५ हजार हेक्टर तर ८६ हजार ३८२ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. मात्र दोन दिवसांपासून पावसाने सतत दगा दिल्याने यावर्षी तरी हवामान अंदाज खरा ठरेल का, अशी चर्चा आहे.
बियाणे उपलब्ध
यावर्षी शेतकरी कापूस, तूर, भात व सोयाबीन या बियाणांची जास्त मागणी करणार असल्याने कृषी विभागाने याआधीच बियाणांचा साठा करून ठेवला आहे. बियाणांचा ऐन हंगामात काळाबाजार होणार नाही, याकरिता कृषी विभागाने उपाय योजनाही आखल्या आहेत.
एक लाख मेट्रिक टन खताची गरज
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एक लाख मेट्रिक टन खताची मागणी आहे. यातील अर्धेहून अधिक खत जिल्ह्याला पुरवठा झाला आहे. येत्या काही दिवसात आवश्यक खत जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे.