पेरलेल्या बियाण्यांचा शेतकऱ्यांनाच ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:43+5:30
तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : सध्या सगळीकडे शेतीचे हंगाम सुरू झाले असून शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतात मेहनत घेत आहे. असे असले तरी जिवती तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबीनचे बियाणे उगविलेच नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे. ऐन हंगामाच्या दिवसात पेरणी केलेले सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला असून हे बियाणे बोगस आहेत. याची नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग जिवती यांच्याकडे तक्रार केली आहे.
संपूर्ण जिवती तालुका हा अतिदुर्गम असून येथे कोरडवाहू शेती आहे.
कापूस, तूर, ज्वारी आणि सोयाबीनचे पीक या तालुक्यात विशेषत: घेतले जाते. शेतीला सिंचनाची कुठलीही सोय नसताना येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती करीत असतो.
अशाही स्थितीत शेतकऱ्यांना जर बि- बियाणे बोगस मिळत असतील आणि उगवत नसेल तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऐन हंगामात सोयाबीन उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.
तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.
यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पंचनामा केला आणि तसा अहवाल कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे पाठवला आहे. तेथील अधिकारी सोमवारी शेतात पाहणी करायला येणार आहेत, असे सांगितले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली असून त्यानुसार शेतात जाऊन आम्ही पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल वरच्या पातळीवर पाठविला आहे. त्यांची चमू येणार असून त्यानुसार चौकशी होणार आहे.
- पल्लवी गोडबोले,
तालुका कृषी अधिकारी, जिवती