मुलांनो, निरोगी दातांसाठी चाॅकलेटस खाणे टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:30 AM2021-08-27T04:30:35+5:302021-08-27T04:30:35+5:30
लहानपणापासून मुले गोड पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देतात. कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करणे गरजेचे असते; परंतु अनेकदा लहान ...
लहानपणापासून मुले गोड पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देतात. कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करणे गरजेचे असते; परंतु अनेकदा लहान मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, दातांच्या किडीच्या आजाराला सामोरे जावे लागते. दातांची कीड आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेणे आवश्यक आहे.
पालकांनी मुलांच्या दातांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यास दात स्वच्छ राहण्याबरोबर ते मजबूत राहू शकतात. दातांना कीड लागू नये यासाठी नियमित ब्रश करणे आवश्यक आहे.
बाॅक्स
लहानपणीच दातांना कीड
दात स्वच्छ नसल्यामुळे दात किडणे आणि हिरड्यांचे विविध आजार मुलांना लहान वयातच जडू शकतात. हिरड्यांना सूज येणे, दुखणे असे मुलांना त्रास होतात. या रोगांमुळे मुलाच्या पक्क्या दातांवरही परिणाम होऊ शकतो. मुलांच्या दातदुखीच्या त्रासामुळे त्यांना अन्न चावून खाण्यास त्रास होतो. यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही.
बाॅक्स
चाॅकलेट न खाल्लेलेच बरे
लहान मुलांचा गोळ्या, चॉकलेट, बिस्कीट वगैरे खाण्याकडे कल जास्त असतो. त्या तुलनेत ते ब्रश बरोबर करीत नाही. त्यामुळे दात किडण्याचे प्रमाणात वाढते. चॉकलेट, कँडीज मुलांना आवडणारे पदार्थ कमी प्रमाणात देणे आवश्यक आहे. यामुळे दातांना कीड लागण्याची शक्यता आहे. शक्यतो चाॅकटेल खाऊ नये. चाॅकलेट तसेच गोड पदार्थ खाल्ले तरीही त्वरित ब्रश करावा. यामुळे दातांची निगा राखता येईल.
बाॅक्स
अशी घ्या दातांची काळजी
दररोज रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी ब्रशिंगची सवय लावा. आई-वडिलांनी मुलांसमोर स्वत: रोज रात्री ब्रश करावा, यामुळे मुलांना सवय लागेल. लहान बाळांसाठी बेबी ब्रश वापरावा. मुले पाच वर्षांची होईपर्यंत पालकांनी स्वत: त्यांचे दात ब्रश करावेत. १० ते १२ व्या वर्षांपर्यंत दुधाचे दात पडतात. दुधाचे दात पडल्यानंतर दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करणे आवश्यक आहे. दातांच्या तपासणीतून दातांमध्ये कोठे कीड लागली किंवा काय हे कळते. तपासणीमुळे किडलेल्या दातांमध्ये त्यावेळी सिमेंट भरता येते.
बाॅक्स
दंतरोग तज्ज्ञ म्हणतात....
मुले मोठ्या प्रमाणात चाॅलकेटसह फास्टफूड, जंक फूड, गोड पदार्थ खातात. चाॅकटेलमध्ये चिकट, गोड पदार्थ असतो. त्यामुळे तो दातांना चिकटतात. मात्र, मुले दातांची योग्य स्वच्छता करीत नसल्याने किडीचा प्रादुर्भाव होताे. वेदना सुरू होते. लहान मुलांनी सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा ब्रश करावा. रात्री झोपताना स्वच्छ पाण्याने गुळणा करावा.
-डाॅ. संदीप आर. पिपरे
जिल्हा दंत शल्यचिकित्सक, चंद्रपूर