वर्षभरापासून घरात बसून मुले कंटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:55+5:302021-04-29T04:20:55+5:30
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतर माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या; परंतु, ...
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतर माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या; परंतु, पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी एक वर्षांपासून मुले घरात कोंडली आहेत. मुक्तपणे मैदानावर खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल आणि टीव्हीव्यतिरिक्त मनोरंजनाचे साधन शिल्लक नाही. घराबाहेर पडल्यास पालकांकडून मज्जाव आहे. एकाच ठिकाणी बसून मुले बोअर झाली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. त्यामुळे पालकांनाही आपल्या मुलांची चिंता सतावत आहे. आपल्या मुलाचा तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा. त्याच्यासोबत गप्पा गोष्टी कराव्या तसेच छोटे-मोठे खेळ खेळावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
बॉक्स
शारीरिक आरोग्यावर परिणाम पडण्याची भीती
कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. मुलांना घरीच राहावे लागत आहे. टीव्ही व मोबाईलवरच वेळ घालविणे सुरू आहे. मित्र, सवंगडी भेटत नसल्याने मुलांचे मैदानी खेळ खेळणेच बंद झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम पडण्याची शक्यता आहे.
कोट
घरातील वातावरण जर तणावाचे असेल तर त्याचा परिणाम मुलांवरही पडत असतो. त्यामुळे मुलांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. घरी राहण्याचे फायदे सांगावे. त्यासोबतच मुलांसोबत आई-वडिलांनी वेळ घालवावा. मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी त्याच्यासोबतच चर्चा करावी. घरगुती खेळ खेळावे, त्यामुळे मुलांचा ताण कमी होईल.
-डॉ. विवेक बांबोळे, मानसोपचार तज्ज्ञ, चंद्रपूर
--------
कोट
कोरोनामुळे मुलांच्या सामाजिक जीवनावर परिणाम झाला आहे. मित्र व शिक्षकांच्या माध्यमातून मुले जे शिकतात. त्याचा अभाव दिसून येत आहे. कोरोनामुळे घरातील वातावरणामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम पडत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत खेळावे, चांगल्या सकारात्मक गोष्टी सांगणे गरजेचे आहे.
डॉ. अभिलाषा गावतूरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर