खरीपाने मारले, टरबुजाने तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:04+5:302021-04-09T04:30:04+5:30
आर्वी येथील शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम तोहोगाव : कापूस व सोयाबीन हे या भागातील मुख्य पीक. परंतु यावर्षी कापसावर आलेल्या ...
आर्वी येथील शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम
तोहोगाव : कापूस व सोयाबीन हे या भागातील मुख्य पीक. परंतु यावर्षी कापसावर आलेल्या बोंडअळीमुळे उत्पादनावर खूप परिणाम झाला असून खर्चही निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला असतानाच आर्वी येथील शेतकरी अब्दुल शेख यांनी कृषी विभागाचे प्रशांत गजभिये यांच्या मार्गदर्शनात जानेवारी महिन्यात टरबूज या पिकाची लागवड करून लाखोंचा नफा कमावून एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे.
त्यांनी दोन हेक्टर क्षेत्रावर टरबूजची लागवड केली होती. त्यांच्याकडे ठिबक संच असल्याने गजभिये यांनी सांगितल्याप्रमाणे प्लास्टिक मल्चिंगचा वापर केला. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन उत्पादन खर्चात बचत झाली. शेख यांनी टरबूज घेण्यासाठी एक लाखाचा खर्च केलेला असून, त्यांना ४५० ते ५०० क्विंटलपर्यंत उत्पादन यापासून मिळेल, असा अंदाज आहे. ठोक बाजारात सध्या १० रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे. यापासून अंदाजे ४.५ ते ५ लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे.