ताडोबाच्या जंगलातील राजाने पळवली फायबरची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:42 AM2018-01-09T11:42:12+5:302018-01-09T11:42:30+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव गेट परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्याचे फायबर टोपले ठेवले होते दरम्यान, अचानक जंगलाच्या राजाने चक्क टोपले तोंडात घेऊन पसार झाल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव गेट परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्याचे फायबर टोपले ठेवले होते दरम्यान, अचानक जंगलाच्या राजाने चक्क टोपले तोंडात घेऊन पसार झाल्याची घटना घडली. त्याचवेळी गाईडने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपून समाज माध्यमात व्हॉयरल केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीदेखील अशी घटना घडली होती.
वाघाच्या दर्शनासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात ताडोबा अंधारी- व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. पर्यटकांनाही वाघाचे हमखास दर्शन होते. त्यामुळे दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ताडोबाची जगभरात ओळख निर्माण झाली. ताडोबातील वाघाची संख्या वाढल्याने अधिवासासाठी जंगल कमी पडू लागले. या व्याघ्र प्रकल्पात वाघ जास्त असल्याने सहजपणे दर्शन होते. सध्या पर्यटकांच्या सुलभ प्रवासासाठी ताडोबातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे.
खडसंगी ते नवेगाव ताडोबा या रोडवर खडीकरण करणे सुरु आहे. या कामावर गिट्टी मुरूम पसरविण्यासाठी मजूर काम करीत आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास नवेगाव गेटपासून काही अंतरावर मजुर काम करीत असताना त्यांच्याकडील प्लास्टिक टोपले तोंडात घेऊन जंगलाचा राजा पसार झाल्याचा क्षण काही पर्यटक व गाईडने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. यापूर्वीदेखील असाच प्रकार मोहूर्ली परिसरात घडला होता. मजुरांचे जेवणाचे डब्बे तोंडात घेऊन वाघोबा पसार झाला होता.