वेकोलि कामगार वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:14+5:302021-08-17T04:33:14+5:30
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस येथे कामगारांसाठी विविध कॉलनी आहेत. त्या कामगार वसाहतीमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे असले तरी ...
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस येथे कामगारांसाठी विविध कॉलनी आहेत. त्या कामगार वसाहतीमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे असले तरी साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. कामगार व परिवाराचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत व्यवस्थापन व कामगार संघटना दखल घेत नसल्याने शहर काॅंग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांनी स्वखर्चाने साफसफाई केली.
कामगार वसाहत बरीच मोठी आहे. क्वाॅर्टरची जीर्ण अवस्था असून, मोळकळीस आले आहे. ३० वर्षांपूर्वी वर्धा नदीवरून टाकलेली लोखंडी पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन ठिकठिकाणी फुटलेली असून, सांडपाण्याच्या नालीखालून गेली आहे. त्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. साफसफाईकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वणी क्षेत्रात विविध कामगार संघटना असल्या तरी कामगाराच्या व कुटुंबीयांच्या आरोग्याबाबत गंभीर नाही. त्यामुळे आता आपल्या आरोग्याचे संरक्षण व्हावे यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्याकडे घाव घ्यावी लागत आहे.
कामगार बांधवांनी घुग्घुस कॉंग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. मात्र व्यवस्थापनाने तत्काळ दखल न घेतल्याने स्वखर्चाने कचरा गोळा करून आपल्या ट्रॅक्टरने बहार फेकून कचऱ्याची विल्हेवाट लावली.