कंट्रोल रूममधील खणखणाट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:38+5:302021-07-15T04:20:38+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यासंबंधी योग्य माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ...
चंद्रपूर : कोरोना रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यासंबंधी योग्य माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष सुरू केला. या कक्षातून हजारो रुग्णांना आधार मिळाला. कोरोना काळात नियंत्रण कक्षातील फोन सारखा खणखणत होता. आता मात्र रुग्णसंख्या घटल्यामुळे येथे शांतता बघायला मिळत आहे.
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी कोरोना काॅल सेंटर सुरू केले. रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांना बेड, रुग्णालयाबाबतची माहिती दिली. एवढेच नाही तर कोरोना रुग्णांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. आता रुग्णसंख्या घटली आहे. मात्र, कोरोना काॅल सेंटरमध्ये अनावश्यक फोन अधिक येत असून, इतरही बाबींची विचारणा केली जात आहे.
मागील दीड वर्षामध्ये ८५ हजारांवर रुग्णसंख्या गेली. त्यामुळे प्रत्येक रुग्णांना रुग्णालय, बेड, औषधोपचाराबाबत माहिती मिळविण्यासाठी काॅल सेंटरमधून मदत करण्यात आली, तर होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची या काॅल सेंटरमधून विचारपूस करण्यात आली. आता रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे या काॅल सेंटरमधील कामाचा भार कमी झाला आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये या काॅल सेंटरचा अनेकांनी आधार घेतला. आता मात्र या काॅल सेंटरमध्ये लसीकरण तसेच इतर बाबींसाठीच अधिक फोन येत असून, नागरिकांच्या उलट-सुलट प्रश्नांचे उत्तर देणेही येथील कर्मचाऱ्यांना कठीण जात आहे.
बाॅक्स
लसीकरण केंद्र कधी सुरू होणार?
काेरोना काॅल सेंटरमध्ये आता नागरिक लसीकरणसंदर्भात अनेक प्रश्न विचारत आहेत. अनेकवेळा लस मिळणार की नाही, कुठल्या केंद्रात नंबर लागेल, कोणती लस घेणे योग्य आहे, यासंदर्भात अनेकवेळा फोन येत आहेत. तर काही वेळा कोव्हॅक्सिन घेऊ की कोविशिल्ड याबाबतची विचारणा केली जात आहे.
कोट
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये काॅल सेंटरमध्ये फोन करणाऱ्यांची संख्या अधिक होती. येणाऱ्या प्रत्येक काॅलची दखल घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेषत: काॅल सेंटरमधून रुग्णांच्या प्रकृतीची विचारणासुद्धा करण्यात आली. आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे काॅल सेंटरमधील थोडाफार भार कमी झाला.
- डाॅ. किशोर भट्टाचार्य
कक्ष प्रमुख, कोरोना काॅल सेंटर चंद्रपूर