...अन् ग्रामपंचायतीलाच ठोकले टाळे! कमिटीच बरखास्त करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 04:02 PM2023-10-17T16:02:56+5:302023-10-17T16:05:08+5:30
संतप्त गावकरी झाले आक्रमक
चिमूर (चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सीमेलगत असलेल्या कोलारा ग्रामपंचायतीमधील सरपंच, सदस्य ग्रामविकासाच्या योजनेला बगल देत सर्व कमिटी ग्रामस्थांना अंधारात ठेवून स्वतःचाच विकास करण्यासाठी काम करीत आहेत. ताडोबा व्यवस्थापनाकडून आलेले पत्र गावात मुनादी न देता स्वतःच्या स्वार्थासाठी आर्थिक व्यवहार करून परस्पर विल्हेवाट लावतात. गेटवर नवीन जिप्सी लावण्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. या प्रकारामुळे रविवारी गावकऱ्यांनी बोलावलेल्या ग्रामसभेत सरपंच, सदस्य गैरहजर होते. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
ग्रामपंचायत कमिटी व प्रशासनाचा निषेध करीत ग्रामपंचायत कमिटीच बरखास्त करण्याचा अलिखित ठराव गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दोन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या कोलारा गावात नऊ सदस्यीय ग्रामपंचायत कार्यरत आहे. गावालगत ताडोबाचे कोअर झोनचे पर्यटन गेट असून, या गेटवरून रोज शेकडो पर्यटक ताडोबात भ्रमंती करतात. यातून गावात जिप्सी चालक, गाइड यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र सरपंच, सदस्य गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर हितसंबंध जोपासत आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचा प्रकार २८ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेच्या प्रकारातून उघडकीस आला. गेटवर नवीन जिप्सी लावण्याचा विषय विषयसूचीत नसताना नागरिकांना अंधारात ठेवून धनराज कोयचाडे, सचिन डाहुले, रोहित वाघमारे, किशोर येरमे यांच्या नवीन जिप्सी गेटवर लावण्याबाबत ठराव स्वमर्जीने सरपंच, ग्रामसेवक यांनी घेतला. ही बाब गावकऱ्यांना माहीत होताच गावकऱ्यांनी पूर्ण ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्यासाठी एल्गार पुकारत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज गभने ताफ्यासह दाखल झाले. कोलारा गेट व्यवस्थापन व पंचायत समितीचे अधिकारी आमच्या मागण्या सोडवत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा तंमुस अध्यक्ष रतीराम वानडरे, विकास मडावी, रतीराम डेकाटे, प्रभाकर नैताम, विनोद उईके, मंगला धारणे, खेमाबाई खाटे व गावकऱ्यांनी घेतला आहे.