कोलगावला पुराचा वेढा, संपर्क तुटला; वेकोलीच्या मातीमुळेच पूरपरिस्थिती
By साईनाथ कुचनकार | Published: July 23, 2023 05:59 PM2023-07-23T17:59:37+5:302023-07-23T18:11:38+5:30
वेकोलीच्या धोपटाळा कोळसा खाणीतील मातीचे ढिगारे पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या कोलगावला पुराने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटलेला आहे. सास्ती-कोलगाव मार्ग शनिवारी दुपारीच बंद पडला तर कोलगाव-कढोली रस्ता रात्री १० वाजताच्या सुमारास बंद झाला. वेकोलीच्या धोपटाळा कोळसा खाणीतील मातीचे ढिगारे पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे राजुरा तालुक्यातील नदीपट्यातील कोलगावला सर्वप्रथम पुराचा फटका बसतो. यावर्षी वेकोलीने कोलगावच्या रस्त्याच्या आजूबाजूला धोपटाळा खुल्या कोळसा खाणीच्या मातीचे ढिगारे टाकले आहे. यामुळे पुराचा फटका लवकरच बसला. या ढिगाऱ्यामुळे पुराचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होऊन पाणी अडले आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. परिसरातील शेती पाण्याखाली गेली असून, मोठे नुकसान झाले आहे.
सास्ती गावातही पाणी
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे व वेकोलीच्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरातील गावांना पुराचा फटका बसला. सास्ती गावातही पुराचे पाणी शिरले. प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सास्ती परिसरातील शेतीही पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे.