कोंडवाड्यातील जनावरांना ना चारा, ना पाणी !
By admin | Published: July 1, 2016 01:08 AM2016-07-01T01:08:20+5:302016-07-01T01:08:20+5:30
जनावरांची तस्करी करीत असताना कोठारी पोलिसांनी कारवाई करुन पकडले. कायदेशीर कारवाई करुन १७ जनावरांना कोठारी ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकण्यात आले.
ही कसली शिक्षा ?: ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष
कोठारी : जनावरांची तस्करी करीत असताना कोठारी पोलिसांनी कारवाई करुन पकडले. कायदेशीर कारवाई करुन १७ जनावरांना कोठारी ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकण्यात आले. मात्र सदर जनावरांच्या चारा पाण्याची तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यात ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार दिसून आला.
१४ बैल व तीन म्हशींना अवैधरित्या खरेदी करुन तस्करी करीत असल्याचा सुगावा ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना लागला. त्यांनी सापळा रचून तस्करांच्या तावडीतून जनावरांना मुक्त केले. तस्करांवर गुन्हे दाखल करुन अटक केली. जप्त करण्यात आलेल्या १७ जनावरांना २५ जूनला कोठारी येथील ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकले. ठाणेदारांनी दोन दिवस जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली. मात्र त्यानंतर ग्रामपंचायतीने जनावरांना चारा रोज देणे बंद केले. ग्रामपंचायतीकडे चारा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चाऱ्याची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोंडवाड्यातील जनावरांची योग्य निगा व त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी असताना व त्याचा मोबदला मिळत असताना त्याकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चारा संपला असेल तर त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. जनावरे कोंडवाड्यात टाकल्यापासून त्याची जबाबदारी १७ दिवस ग्राम पंचायतीची असते. त्यानंतर त्यांचे मालक न आल्यास लिलावाद्वारे जनावरे विकण्यात येतात. मात्र बंदिस्त जनावरांच्या चारा, पाणी व आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने उचलली पाहिजे. सध्या पावसाळा सुरू असून कोंडवाड्यात चिखल पसरला आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. जनावर दगावल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असाही प्रश्न आहे.
तस्करी करताना जनावरांना मुक्त करुन कोंडवाड्यात टाकण्यात आले. त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. दरम्यान, जनावरांच्या देखभालीचा मोबदला ग्रामपंचायतीला प्राप्त होतो. तेव्हा त्यांनीच जबाबदारी स्वीकारावी, असे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी सांगितले. (वार्ताहर)