कोरपनाने गाठले पहिल्या डोसचे ६५ टक्के उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:20+5:302021-09-07T04:33:20+5:30
जयंत जेनेकर कोरपना : कोरोना लसीकरण मोहिमेत कोरपना तालुक्याने प्रथम डोसचे ६५ टक्के डोस पूर्ण केले आहेत. यासोबत आजतागायत ...
जयंत जेनेकर
कोरपना : कोरोना लसीकरण मोहिमेत कोरपना तालुक्याने प्रथम डोसचे ६५ टक्के डोस पूर्ण केले आहेत. यासोबत आजतागायत ५८,७५७ पहिला, १५,३३३ दुसरा डोस असे एकूण ७४ हजार २९० डोस देण्यात आले आहेत.
तालुक्याची अठरा वर्षे वयोगटावरील ९० हजार ५८८ लोकसंख्या आहे. यात हे डोस देण्यात आले आहेत. यासोबत २५ कोरोनामुक्त गावातही शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये कारवाही, भोईगुडा, जांभूळधरा, उमरहिरा, बेलगाव, चिंचोली, निजाम गोंदी, झोटिंग, आसन बु., इरई, टांगला, एकोडी, कोराडी, कोल्हापूर, चोपन, रुपापेठ, कमलापूर, सिंगार पठार, रायपूर, कोठोडा खु., मांगलहिरा, गोविंदपूर, शिवापूर, तुळशी आदी गावांचा यात समावेश आहे.
यासाठी आरोग्य, महसूल, पोलीस व सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी व्यापकदृष्ट्या जनजागृती करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिल्याने लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लसीकरण मोहीम ही तालुक्यातील केंद्रावर वेगवान झाल्याचे बघावयास मिळते आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणेचा योग्य समन्वय असल्यामुळे लसीकरणाच्या कामाला कोरपना, गडचांदूर, नांदा, आवारपूर, वनसडी, कवठाळा, पारडी, कोडशी या मोठ्या गावांसह गाव खेड्यातही गती मिळत आहे. या लसीकरण मोहिमेकरिता दालमिया, अल्ट्राटेक, अंबुजा सिमेंट उद्योगाकडून वाहन, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लॅपटॉप, सिरिंजची मदत वेळोवेळी प्राप्त होत आहे.
कोट
या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, १८ वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांनी कुठलीही शंका न बाळगता लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. स्वप्नील टेंभे
तालुका वैद्यकीय अधिकारी, कोरपना