पहिली लस घेण्यात कोरपना तालुका जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:17+5:302021-09-23T04:31:17+5:30
आशिष देरकर कोरपना : कोरोना या जागतिक महामारीपासून बचावासाठी शासनाकडून नागरिकांच्या लसीकरणाला फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे. ...
आशिष देरकर
कोरपना : कोरोना या जागतिक महामारीपासून बचावासाठी शासनाकडून नागरिकांच्या लसीकरणाला फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे. कोरपना तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने लसीकरणाची ७४.२० टक्केवारी गाठून पहिली लस घेण्यात जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.
तहसील कार्यालय, कोरपना, पंचायत समिती, कोरपना, आरोग्य विभाग व गावागावांतील लोकप्रतिनिधींच्या यशस्वी नियोजनामुळे लसीकरणाचा इतका मोठा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. जिल्ह्यात पहिली लस घेण्यात ७१.८५ टक्क्यांसह भद्रावती तालुका द्वितीय क्रमांकावर तर, ७०.६९ टक्क्यांसह पोंभुर्णा तालुका तृतीय क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे लसीकरणाच्या टक्केवारीत ज्येष्ठांची संख्या सर्वांत जास्त आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथे डॉ. रामेश्वर बावणे, मांडवा येथे डॉ. शालिनी तरोने व नांदा-बिबी या औद्योगिक क्षेत्रामध्ये डॉ. चंदनखेडे यांनी विशेष सेवा देत यशस्वीरित्या लसीकरण केले. त्यात गावागावांतील अशा सेविकांचेसुद्धा मोठे योगदान आहे.
कोट
प्रत्येक गाव खेड्यातील आरोग्य कर्मचारी गावातील लोकांना जागृत करून लसीकरणासाठी प्रवृत्त करीत असल्यामुळे लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारीसुद्धा वाढली आहे. अनेक गावात १०० टक्के लसीकरण झाले आहे.
- महेंद्र वाकलेकर, तहसीलदार, कोरपना
कोट
आरोग्य विभागाच्या मदतीने प्रत्येक गावातील आमचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर या सर्वांच्या सहकार्याने लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला खेड्यापाड्यातील नागरिकांना लसीकरणाबाबत जागृती नसल्यामुळे लसीकरणाची टक्केवारी घसरली होती. मात्र, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावांतील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
- बाबाराव पाटील, संवर्ग विकास अधिकारी, कोरपना
कोट
प्रत्येक गावाचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आम्हाला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी छोट्या-छोट्या खेड्यांपासून तर मोठ्या गावांपर्यंत एकापाठोपाठ एक लसीकरण घेणे सुरू आहे. आरोग्य यंत्रणेला प्रत्येक ग्रामपंचायतींची चांगली साथ मिळाली आहे. येणाऱ्या काही दिवसांत पहिल्या लसीचे शंभर टक्क्यांचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
- डॉ. स्वप्निल टेंभे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, नारंडा