कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांना लाखो रुपयांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:15+5:302021-03-08T04:27:15+5:30
आवाळपूर : महाराष्ट्र बियाणे महामंडळ अकोला मार्फतीने विविध योजनांचे आमिष दाखवून शासनाची बनावट पावती देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाखोंनी लुटल्याची ...
आवाळपूर : महाराष्ट्र बियाणे महामंडळ अकोला मार्फतीने विविध योजनांचे आमिष दाखवून शासनाची बनावट पावती देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाखोंनी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.
लक्ष्मीकांत नानाजी मेश्राम हा पोंभूर्णा येथील रहिवासी असून, महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोलामार्फत काम करीत असल्याचे सांगून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे आमिष दाखवून बनावट पोचपावती व फॉर्म देऊन प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १२ ते १५ हजार अशी रक्कम घेऊन पसार झाला आहे.
तालुक्यातील एकूण ४० ते ५० शेतकऱ्यांकडून जवळपास २५ लाख इतक्या रकमेचा महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोला महाराष्ट्र शासन अशी बनावट पावती देऊन पैसे घेतले असून, त्या नंतर या व्यक्तीशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकत नसल्याने शेतकरी चिंतेत पडले. शेतकऱ्यांनी काही दिवसांनंतर मूल येथील महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ कार्यालयात धाव घेतली असता अशी कुठलीही व्यक्ती आमच्याकडे कार्यरत नसून आम्ही याला ओळखत नाही, याबाबत गडचांदूर पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.
कोट
मला तार कंपाऊंडची योजना सांगितली व १४ हजार रुपयांची पावती दिल्याने मी निश्चिंत झालो. परंतु काही काळ लोटल्यानंतर टोलवाटोलवी चालू झाली. वारंवार फोन करून लागत नसल्याने शंका बळावली. त्यानंतर काही शेतकरी मिळून पोलिसांत तक्रार दाखल केली असून, फसवणूक करणाऱ्या भामट्याला कडक शिक्षा करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- महेश राऊत, शेतकरी, नांदा.
कोट
या प्रकरणासंदर्भात ठाण्यात तक्रार आली असून, शहानिशा करून सखोल चौकशी सुरू आहे.
- गोपाल भारती ठाणेदार, गडचांदूर पोलीस ठाणे.