कोरपना तालुक्याला अद्यापही रेल्वेमार्गाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:31+5:302021-08-01T04:25:31+5:30
नांदाफाटा : तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्याला गडचांदूर ते आदिलाबाद रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आजही कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ...
नांदाफाटा : तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्याला गडचांदूर ते आदिलाबाद रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आजही कायम आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चार सिमेंट कंपन्या तालुक्यात सुरू आहेत. सद्यस्थितीत सिमेंट कंपन्यांकडे जाणारे रेल्वे मार्ग मालवाहतुकीच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे. परंतु नागरिकांसाठी आवश्यक असलेला गडचांदूर आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही तयार करण्यात आलेला नाही. याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींनी जनतेला आश्वासन दिले. काही वर्षांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले. सद्यस्थितीत कोरपना तालुक्यात अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, अंबुजा, दालमिया, माणिकगड कंपन्या सुरू आहेत. हा रेल्वे मार्ग झाल्यास गडचांदूर सह नांदाफाटा, आवारपूर, कोरपना आदी शहरांना रेल्वे प्रवास करणे सुकर होईल. आदिलाबाद ते नांदेड मार्गे मुंबई असा प्रवास कमी खर्चात आणि कमी वेळेत नागरिकांना करणे सोयीचे होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना बाजारपेठेसाठी ही याचा मोठा फायदा होणार आहे. देशातील मोठी कापसाची बाजारपेठ म्हणून तेलंगणातील आदिलाबाद प्रसिद्ध आहे आणि रेल्वेमार्ग झाल्यास शेतकरी मोठ्या शहरांना जोडला जाईल.
बॉक्स
...तर मुंबईला जाणे सोईचे
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील कामगार काम करत आहे. सद्यस्थितीत मुंबईला प्रवास करण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना बल्लारपूर, नागपूर तसेच आदिलाबादला जाऊन रेल्वे प्रवास करावा लागत आहे. उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई आदी ठिकाणी जाण्यास हा मार्ग जास्त उपयोगी पडेल. त्यामुळे साधारणता ७२ किलोमीटर अंतर असलेला हा मार्ग सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.