कोरपना-उमरेड बससेवा सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:54+5:302021-01-08T05:32:54+5:30
गडचांदूर : येथून वणी-चिमूरमार्गे उमरेड बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. या बससेवेमुळे कोरपना येथील नागरिकांसह वणी, ...
गडचांदूर : येथून वणी-चिमूरमार्गे उमरेड बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. या बससेवेमुळे कोरपना येथील नागरिकांसह वणी, वरोरा, जाम, वर्धा व चिमूर परिसरातील प्रवाशांनाही सोयीचे होईल. बऱ्याच बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र, एसटी महामंडळाने या मार्गाचा विचार बससेवा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मास्क ठरत आहे फॅशन
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी असला तरी संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे मास्क लावल्याशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनातर्फे केल्या जात आहेत. मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून मास्क लावत आहेत. मात्र हनुवटीवर ठेवून प्रशासकीय कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये मात्र नुकसान नागरिकांचेच आहे. त्यामुळे हनुवटीवर मास्क न ठेवता तोंड आणि नाक व्यवस्थित झाकेल असा लावणे गरजेचे आहे. संसर्ग टाळण्यासाठी अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, मास्क न घातल्यास दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे दंड वाचविण्यासाठी अनेकजण मास्कचा वापर करीत आहेत. मात्र केवळ हनुवटीवरच मास्क ठेवत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.
कमी दाबामुळे वीज ग्राहकांना त्रास
जिवती : तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. दिवसभर विजेचा कमी-अधिक दाब असतो. काही वेळा एका फेजची वीज राहत नाही. यामुळे ग्राहकांत रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नेटवर्कअभावी कामांत अडथळा
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात नेटवर्कसेवा विस्कळीत झाली आहे. नागरिकांच्या ऑनलाईन कामामध्ये व्यत्यय येत आहे. त्यामुळे नेटवर्कसेवा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. कोरोनामुळे बहुतेक विभागाचे कामकाज वर्क फार्म होम पद्धतीने सुरू आहे. तर शाळा, महाविद्यालये बंद असूनही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन कामात व्यत्यय येत आहे.