कोरपनाचे भूमी अभिलेख कार्यालय रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:08+5:302021-09-25T04:29:08+5:30
कोरपना : कोरपना येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे बरीचशी कामे खोळंबली असून, त्याचा फटका ...
कोरपना : कोरपना येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे बरीचशी कामे खोळंबली असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
या कार्यालयात एकूण १५ पदे मंजूर आहेत. यातील उपअधीक्षक, मुख्यालय सहायक, दुरुस्ती लिपिक, दोन भूकरमापक, कनिष्ठ लिपिक अशी सहा प्रमुख पदे रिक्त आहेत. या कार्यालयाची प्रभारी प्रमुख उपअधीक्षक पदाची धुरा दोन अधिकाऱ्यांकडे आहे. राजुरा येथील उपअधीक्षकांकडे पगार बिलांना मंजुरी देणे, तर वरोरा येथील शिरस्तेदार पदाचा कारभार असलेल्यांना कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आहे. राजुरा येथील उपअधीक्षकांना कोरपनासह जिवतीचाही प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना तिन्ही ठिकाणचा डोलारा सांभाळावा लागत आहे.
तसेच येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस दोन-दोन टेबल सांभाळावे लागत आहेत. परिणामी त्यांचीही चांगलीच दमछाक होते आहे. कोरपना तालुक्यात ११३ गावांचा समावेश आहे. हा तालुका औद्योगिक व कृषी प्रधान म्हणून सर्वदूर परिचित आहे. याचा लोकसंख्या व भौगोलिक विस्तारही मोठा आहे. यातील अनेक गावे दूर अंतरावर वसलेली असून, त्यांना एकाच वेळी काम होत नसल्याने वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. यात त्यांना वेळ व आर्थिक असा दुहेरी भुर्दंड सोसावा लागत आहे.
बॉक्स
अनेक कामे प्रलंबित
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे तालुक्यातील शेती, पांदण, महामार्ग, गावठाण, ड्रोन व भूसंपादनाची मोजणी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. यादृष्टीने येथील कामकाज गतिमान होण्यासाठी रिक्त पदाचा त्वरित भरणा होण्याची गरज आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.