पोंभुर्णा तालुका विकासापासून कोसोदूर
By admin | Published: July 21, 2014 12:07 AM2014-07-21T00:07:27+5:302014-07-21T00:07:27+5:30
पोंभूर्णा तालुका आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तालुका होऊन १५ वर्षे झाले. मात्र अजूनही विकास झालेला दिसून येत नाही.
देवाडा खुुर्द : पोंभूर्णा तालुका आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तालुका होऊन १५ वर्षे झाले. मात्र अजूनही विकास झालेला दिसून येत नाही.
तालुक्यामध्ये ७१ गावे आहेत. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि ३२ ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत आहे. आरोग्य व रस्त्याच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही. तालुक्याचा विचार केल्यास गंगापूर, टोक, कुराना, घोसरी, देवाडा, जुमगाव लोक बल्लारपूर, देवई चेक आबेधानोरा, सोनापूर चेक आष्टा व अनेक खेड्यांना जोडण्यासाठी योग्य रस्ताच नाही. त्यामुळे त्या गावच्या नागरिकांना तालुक्याशी संपर्क करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक गावातील विद्यार्थ्यांना पायी येऊन पोंभूर्णा येथे शिक्षण घ्यावे लागत आहे. अशावेळी रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने वाहन गावापर्यंत पोहचत नाही. सायकल दुचाकी वाहन किंवा बैलबंडीचा आधार घ्यावा लागतो. रुग्णांंचीही मोठी हेळसांड होते. मात्र ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे ते उपचारापासून वंचित राहतात. त्यामुळे उपचार करण्यापेक्षा जडीबुटी बरी असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते. गेल्या एक ते दोन वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी असूनसुद्धा अजूनही कामे सुरू झालेली नाही. त्याचप्रमाणे न्यायालयाचे कामकाज भाड्याच्या घरामध्ये सुरू आहे. १५ वर्ष लोटूनही पोंभूर्णा तालुका विकासापासून दूरच राहिला आहे. पं.स. इमारतीचे बांधकाम धिम्या गतीने सुरू आहे. काही कार्यालय भाड्याच्या घरात आहेत. त्यामुळे तालुक्यातील तहसिल कार्यालय, पंचायत समिती व इतर कार्यालयात अजूनही लोकांची कामे वेळेवर होत नाही. या भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला हवा. मात्र लोकप्रतिनिधी गप्प राहण्यातच धन्यता मानतात. यामुळे पोंभूर्णा तालुक्याचा वाली कोण? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नेहमी अनेक राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी निवडणुका जवळ येताच विकासाच्या मुद्यावर बोलताना दिसतात. मात्र त्यांचे हे बोलणे केवळ मते मिळविण्यासाठीच असल्याचे दिसून येते.(वार्ताहर)