कोठारीचे नागरिक पाण्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 09:57 PM2017-08-24T21:57:59+5:302017-08-24T21:58:19+5:30
येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही. थकित वीज देयके भरण्यास ग्रा.पं. तयार असतानाही वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित ठेवून गावकºयांना पाण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असून गावात तीव्र संताप पसरला आहे.
वीज वितरण कंपनीचे कोठारी ग्रा.पं. पाणीपुरवठा योजनेचे तीन लक्ष देयक थकीत आहे. सन २००८ पासून वीज वितरण कंपनीच्या कोठारी येथील ३३ केव्ही. सब स्टेशन व कर्मचारी निवासस्थान वसाहत हजारो फूटात बसली आहे. यावर ग्रा.पं.ने सर्वसामान्य नागरिकांच्या घरासाठी आकारण्यात आलेल्या करापेक्षा कमी दराची आकारणी केली. मात्र गेल्या दहा वर्षांपासून वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे थकीत कराचा भरणा केलेला नाही. तेरा लक्ष रुपये महावितरणकडे थकीत आहेत. त्यासाठी ग्रा.पं.ने अनेकदा पत्रव्यवहार करुन थकीत कराचा भरणा करण्यासाठी विनंती केली. मात्र आकारणी दर जास्त असल्याचा कांगावा करुन थकीत कर भरण्यासाठी महावितणने असमर्थता दर्शविली आहे.
कोठारी गावाची वाढती लोकसंख्येमुळे जुनी नळ योजना अपुरी पडत असल्याचा विचार करुन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी खनीज विकास निधीअंतर्गत विशेष बाब म्हणून ३ करोड ५० लक्ष रुपयाची वर्धा नदीवर नवीन नळ योजना मंजूर केली. नवीन नळयोजनेचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र वीज पुरवण्यासाठी प्रतीक्षा लागून आहे. त्यासाठी संबधीत विभागाने वीज कंपनीकडे पत्रव्यवहार करुन वीज पुरवठा करण्यासाठी सांगितले. मात्र वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे वीज देयक थकीत असून त्याचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा करण्यात येणार नसल्याचे ग्रा.पं.ला सांगितले. परंतु ग्रा.पं.चा वीज वितरण कंपनीकडे लाखो रुपये कर रुपात थकीत असून वीज कंपनीने थकिता देण्याची रक्कम कपात करावी व वीज पुरवठा करण्यास पत्र दिले.
त्यामुळे वीज कंपनीचे अधिकारी व ग्रा.पं. कमिटीने संयुक्त बैठक घेवून तडजोड करीत तीन लक्ष ३५ हजार भरण्याचे ठरले असता पुन्हा वीज मंडळाने ५ लक्ष ८६ हजार रुपये भरण्याचे पत्र दिले आहे. वीज मंडळाच्या अशा दुटप्पी व अडेलतट्टू धोरणाने गावकरी संतापले असून वीज कंपनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला असल्याचा सूर उमटत आहे.
गावकºयांचा आंदोलनाचा इशारा
दहा वर्षांपासून कोठारीची जनता पाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे. नवीन नळयोजना पूर्णत्वास आली, मात्र वीज पुरवठा महावितरण कंपनी करीत नसल्याने गावकºयांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा करुन गावकºयांना पाणी पुरवठा न केल्यास कोठारीचे नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रा.पं. उपसरपंच अमोल कातकर यांनी दिला आहे.