पाच दिवसांत ११५३ व्यापाऱ्यांची कोविड तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:19+5:302021-03-20T04:26:19+5:30
नागभीड : सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. या आजाराची प्रत्येकांनी तपासणी करून घ्यावी, ...
नागभीड : सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. या आजाराची प्रत्येकांनी तपासणी करून घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गेल्या पाच दिवसात येथील ११५३ व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गो. वा. महाविद्यालयात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत लोकसंपर्कात येणाऱ्या व्यक्तींची चाचणी करून घेण्यात येत आहे. यात व्यापाऱ्यांचा समावेश आहे. १५ मार्चपासून व्यापारी वर्गातील व्यक्तींची कोरोना चाचणी सुरू आहे. १५ मार्च रोजी १४२, १६ मार्चला २१४, १७ तारखेला २०९, १८ मार्च रोजी २७८ आणि १९ मार्च रोजी ३१० व्यापाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली आहे.
एवढेच नाही तर ज्या ठिकाणी समूहाने कामे सुरू आहेत त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची चमू जाऊन अँटिजेन तपासणी करून घेत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीकांत कामडी यांनी 'लोकमत'ला दिली. आतापर्यंत मोहाळी, मिंडाळा व अन्य दोन ठिकाणी तपासणी केल्याचे डाॅ. कामडी यांनी सांगितले.