कृष्णा गोंगलेंचा वाहन चालक ते पीएसआय प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:25 AM2021-02-15T04:25:27+5:302021-02-15T04:25:27+5:30
वढोली : वडिलांची व आईची ताटातूट होऊन दोघांनीही वेगळी चूल मांडली. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही कृष्णा कालिदास गोंगले यांनी ...
वढोली : वडिलांची व आईची ताटातूट होऊन दोघांनीही वेगळी चूल मांडली. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही कृष्णा कालिदास गोंगले यांनी परिश्रमातून पोलीस विभागात दहा वर्षे वाहनचालक म्हणून काम केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक झाले. नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत ते पात्र ठरले. त्यांचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
कृष्णाचे प्राथमिक शिक्षण गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील जि.प. शाळेत झाले. दुसरीत असताना वडील व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबात वाद व्हायचे. आई व बाबांनी वेगवेगळे संसार थाटण्याचा निर्णय घेतला. आईने माहेर गाठला व वडील व्यसनेच्या आहारी, अशा स्थितीत कसबसे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, बहिणीचे लग्न झाले. भाऊजी पोलीस विभागात असल्यामुळे त्यांच्याकडेच राहून, पुढील शिक्षण गडचिरोली, भामरागड, नागपूरला झाले. आई-वडिलांपासून लहानपणापासून दूर राहून प्रचंड मेहनत करून पोलीस विभागाच्या भरतीत सहभाग घेतला व २०१० मध्ये पात्र ठरला. त्यानंतर, नोकरीसोबत पदवीधर शिक्षण घेतले. सोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. १० वर्षे पोलीस विभागात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. नुकत्याच १० फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला व पोलीस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल लागला. त्यात खुल्या प्रवर्गातून कृष्णा यांची निवड झाली आणि त्यांच्या मेहनतीला यश प्राप्त झाले. मनातील आत्मविश्वास व जिद्दीमुळेच त्यांनी हे यश गाठले.