घराच्या खोदकामात सापडले श्रीकृष्णाचे प्राचीन शिल्प; नागरिकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:44 AM2023-02-13T10:44:52+5:302023-02-13T10:51:57+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील खेड येथील प्रकार
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : वैद्यकीय नगरी, शिक्षणाचे माहेरघर असे नामाभिधान असलेल्या ब्रह्मपुरी शहराला ऐतिहासिक आधार आहे. अनेक कोरीव पुरातन खांब आजही शहरात आहेत, तर अनेक खोदकामांत पुरातन शिल्प आढळले आहेत. असाच एक प्रकार जवळच्या खेड येथे उघडकीस आला. घर बांधकामासाठी खोदकाम करीत असताना अवघ्या पाच फुटांवर अखंड पांढऱ्या दगडावर कोरलेली कृष्णाची सुबक मूर्ती आढळली असल्याने मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावरील मौजा खेड येथे गजानन मानकर यांच्या घराचे घरकूल निधीतून बांधकाम करण्यात येत आहे. तर त्यांच्या बाजूला आणखी दोन मानकर परिवाराच्या घरांचे बांधकाम घरकूल निधीतून करण्यात येत आहे. गजानन मानकर यांच्या बांधकामाच्या लगत शौचालयासाठी खोदकाम सुरू केले असता ११ फेब्रुवारीला केवळ पाच फुटांवर आडव्या अवस्थेत दगड दिसून आले. संपूर्ण दगड बाहेर काढून स्वच्छ केले असता पांढऱ्या अखंड दगडावर सुबक अशी कृष्णाची मूर्ती आढळून आली. ही बाब नागरिकांना कळताच बघ्यांची एकच गर्दी झाली. शहरालगत भूगर्भात अनेक पुरातन शिल्पे असल्याचे जाणकार सांगतात. येथील कोट तलावात भूमिगत मार्ग असून तो वैरागडपर्यंत गेला असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने सर्व्हे करून पुरातन वास्तू भूगर्भातून बाहेर काढाव्या, अशी मागणी नागरिक करत आहेत.
मानकर परिवार पूर्वीपासून कृष्णाचे भक्त
खेड येथे मानकर परिवार मोठा आहे. त्यांची घरे लागून असून ज्या ठिकाणी मूर्ती निघाली त्या संपूर्ण जागेवर कृष्णाची गादी होती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मानकर परिवार वडिलोपार्जित कृष्णाचे भक्त आहेत. फार पूर्वी तिथे पुरातन मंदिर असावे व जमिनीत गडले गेले असावे, असा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.