कृष्णनगरवासीय स्वत:च क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:00 AM2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:47+5:30
चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौक शहरातील मोठा चौक मानला जातो. कामगारांचे जंक्शन असलेल्या या चौकात दिवसभर वर्दळ असते. आजुबाजुच्या अनेक वस्त्यांसाठी हा चौक एक बाजारपेठ आहे. या चौकाच्या पलिकडे कृष्णनगर ही गजबजलेली वस्ती आहे. या वस्तीतच पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे शनिवारी रात्रीच कृष्णनगर व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांमध्ये माहित झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशभर कोरोनाचा हाहाकार माजला असताना मागील दीड महिन्यापासून कोरोनामुक्त राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचा शिरकाव झाल्याचे निष्पन्न झाले. कृष्णनगरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर शनिवारी रात्रीपासून प्रशासनाने कृष्ण नगर सील केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्रीच ही वार्ता जिल्हाभर पसरली. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळला त्या कृष्णनगरात रविवारी सकाळपासूनच स्मशानशांतता पसरली होती. प्रशासनाने परिसर सील तर केलाच; मात्र धास्तावलेल्या नागरिकांनीही स्वत:लाच रविवारी लॉकडाऊन करून घेतले. त्यामुळे कृष्णनगरातील गल्लीबोळात पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय कुणीही भटकताना आढळून आला नाही.
चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौक शहरातील मोठा चौक मानला जातो. कामगारांचे जंक्शन असलेल्या या चौकात दिवसभर वर्दळ असते. आजुबाजुच्या अनेक वस्त्यांसाठी हा चौक एक बाजारपेठ आहे. या चौकाच्या पलिकडे कृष्णनगर ही गजबजलेली वस्ती आहे. या वस्तीतच पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे शनिवारी रात्रीच कृष्णनगर व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांमध्ये माहित झाले. त्यानंतर रात्रीच पोलीस व आरोग्य विभागाचे पथक कृष्णनगरात दाखल झाले. संपूर्ण कृष्णनगर, संजय नगर पोलीस प्रशासनाने सील केला. कोरोना रुग्ण आणि पोलिसांची ही कार्यवाही पाहून तेथील नागरिकही कमालीचे धास्तावले. सोमवारी सकाळपासून पुन्हा आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांची या परिसरात रेलचेल सुरू झाली. सोमवारी सकाळपासूनच नागरिक घराबाहेर पडले नाही.
सात किमी परिसर बफर झोन
कृष्णनगर, संजय नगर परिसरात कंटेनमेंट प्लन सुरू करण्यात आला आहे. यासोबतच या परिसराच्या बाहेरील सात किलोमीटर परिसरातील सर्व भाग बफर झोन म्हणून संबोधित करण्यात आला आहे. या ठिकाणीदेखील पुढील १४ दिवस ताप व आजाराबाबतची माहिती गोळा केली जाणार आहे.
शिवाजीनगरातील नागरिकही घाबरले
शिवाजीनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सदर रुग्ण रात्रपाळीत चौकीदार म्हणून काम करत होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकही घाबरले आहेत. या अपार्टमेंटबाबतची माहिती अनेकजण मोबाईलवरून जाणून घेताना दिसले.सदर रुग्ण रात्री १० ते सकाळी ६ या काळात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असायचा. अपार्टमेंटमध्ये राहणाºया सहा कुटुंबातील २८ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी या २८ नागरिकांचे नमुने घेण्यात येणार असून तपासणीला वैद्यकीय नियमानुसार पाठविण्यात येणार आहे.
उपचार करणारे कर्मचारीही क्वारंटाईन
२३ एप्रिलपासून कोरोना रुग्णाला ताप जाणवत होता. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. त्याला आयसोलेशन वार्डमध्ये विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णावर उपचार करणाºया काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. सोबतच या रुग्णाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जात आहे.एक वैद्यकीय चमू गेल्या पंधरा दिवसात हा रुग्ण कुठे कुठे गेला होता, या संदर्भातली चाचपणी करत आहे.
कलेक्टर, एसपी धडकले कृष्णनगरात
शनिवारी कृष्णनगरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघताच रविवारी सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत हे कृष्णनगर परिसरात धडकले. त्यांनी परिसराची पाहणी केली. सदर परिसराची लोकसंख्या किती, परिसर दाट वस्तीचा आहे की विरळ, दुकानांची संख्या किती आदी सर्व गोष्टीचा त्यांनी आढावा घेतला.