कुकुडसाथ गावाने विकास कामात घेतली आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:54 AM2019-07-13T00:54:53+5:302019-07-13T00:55:37+5:30
कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडी कार्यक्रमात कोलांडी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडी कार्यक्रमात कोलांडी येथे केले.
वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीच्या आठव्या दिवशीची सुरूवात जिवती तालुक्यातील कोलांडी गावापासून करण्यात आली. वृक्षदिंडी कोलांडी, कुंभेझरी गावातून वाजतगाजत निघाली. कुकुडसाथ व नारंडा गावात पोहोचल्यानंतर वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. दिंडीसह महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गोदावरी केंद्रे जिल्हा परिषद सदस्य कमला राठोड, जिवती पंचायत समितीचे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकाते, पंचायत समिती सदस्य अंजना पवार, कोरपना तालुक्यात दिंडीसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कोरपना पंचायत समितीचे सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभाशिव कोडापे, आशिष ताजणे व गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. शाम रणदिवे म्हणाले, ग्राम विकास हा पैशानी होत नाही. याला सुसंवादाची गरज असते. ग्रामसविकासाचा संवाद कुकुडसाथ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भुजंग सुर्यवंशी यांनी गावात घडवून आणला. दिंडी दरम्यान गावस्तरावर विविध विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. नारंडा गावात ही दिंडी बैलगाडीवर सजवून गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली. गावात भव्य विराट दिंडीचे स्वरुप निर्माण झाले. यावेळी जिवती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बागडे, कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे यावेळी उपस्थित होते.