शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल बाजारभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:24+5:302021-09-04T04:33:24+5:30
ब्रह्मपुरी : सर्वत्र महागाईने उचांक गाठला असताना शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीचा खर्चही काढणे ...
ब्रह्मपुरी : सर्वत्र महागाईने उचांक गाठला असताना शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीचा खर्चही काढणे कठीण झाले आहे. परिणामी, भाजीपाला गुरांना चारावा लागत असल्याचे वास्तव तालुक्यात दिसत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्याला वैनगंगा नदीने वेढले आहे. त्यामुळे नदीतीरावरील ४० - ५० गावांतील शेतकऱ्यांची शेती सुपीक आहे. येथील माती काळीभोर असल्याने पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे या जमिनीची सुपीकता टिकून राहते. म्हणूनच येथील शेतकरी भात पिकासह भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. एरवी या मालाला बाजारात चांगला भाव मिळतो. मात्र, ऐन पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर अत्यंत कमी आहेत. १० - १५ किमी अंतरावरून शेतकऱ्यांना दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने बाजारात शेतमाल आणावा लागतो; परंतु बाजारात ठोक दराने किरकोळ विक्रेते हा माल खरेदी करताना अत्यंत कमी दराने खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चदेखील निघत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना गुरांना भाजीपाला खाऊ घालावा लागतो.
बॉक्स
प्रति किलो दर
भेंडी - २ रुपये
शिमला मिरची - २५ रु.
दोडका - ८ रु.
फुलकोबी - ३० रु.
पान कोबी - २० रु.
सांबार - ५० ते ६० रु.
कारले - २ रु.
कोट
दरवर्षी भात पिकासह उदरनिर्वाहासाठी भाजीपाला लागवड करतो. मात्र, यावेळी अतिशय कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. लागवड, तोडणी तथा वाहतूक खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करणेदेखील मुश्कील झाले आहे.
- विलाप तुपट,
शेतकरी, पारडगाव.
030921\img_20210903_154716.jpg
भाजीपाला विकताना विक्रेते